तेलंगणाच्या मुद्दय़ाचे संसदेच्या उभय सभागृहांत सोमवारी तीव्र पडसाद उमटले. सदनातील कामकाजात मोठा व्यत्यय निर्माण केल्याबद्दल आंध्र प्रदेशातील काँग्रेसचे पाच व तेलुगू देसमच्या चार खासदारांना लोकसभेच्या अध्यक्षा मीराकुमार यांनी निलंबित केले. याच मुद्दय़ावरून राज्यसभेच्या कामकाजात अडथळे आणल्याबद्दल तेलुगू देसमच्याच दोन सदस्यांना निलंबित करण्यात आले.
सदनाचे कामकाज व्यवस्थित चालावे यासाठी दुपारी दोननंतर उपाध्यक्ष कारिया मुंडा यांनी तेलुगू देसमच्या दोघा आक्रमक सदस्यांना सदनाबाहेर जाण्याची सूचना केली. परंतु या सदस्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. नंतर सदनाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाल्यानंतरही तेलुगू देसमचेच एन. कृस्तप्पा, एम. वेणूगोपाळ रेड्डी आणि एन. शिवप्रसाद हे अध्यक्षांच्या मोकळ्या जागेसमोर ठिय्या देऊन बसले होते. या वेळी तेलुगू देसमचे गटनेते नाम नागेश्वर राव हे विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांच्यासमवेत चर्चा करताना दिसत होते. सदनाचे कामकाज सुरू झाल्यानंतर अध्यक्षा मीराकुमार यांनी उपरोक्त सदस्यांसह तेलुगू देसमचेच के. एन. राव आणि काँग्रेसचे ए. साईप्रताप, अनंत वेंकटरामी रेड्डी, एन. राजगोपाळ, मागुंता श्रीनिवासुलू रेड्डी आणि के. बापी राजू यांनी सातत्याने सदनाच्या कामकाजात अडथळे आणल्याबद्दल त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.
राज्यसभेतही नियम २५५ अन्वये उपसभापती पी. जे. कुरियन यांनी तेलुगू देसमचे सदस्य सी. एम. रमेश आणि वाय. आर. चौधरी यांनी सदनाच्या कामकाजात अडथळे आणल्याबद्दल त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.