वेगळ्या तेलंगणासह इतर विधेयके संसदेच्या चालू अधिवेशनात मंजूर व्हावीत, यासाठी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी विशेष पुढाकार घेतला असून, भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना येत्या बुधवारी संध्याकाळी पंतप्रधानांच्या निवासस्थानी भोजनासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. सिंग यांनी स्वतः रविवारी रात्री भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरूण जेटली यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून त्यांना भोजनाचे निमंत्रण दिले. पंतप्रधानांनी सोमवारी संध्याकाळीच या सगळ्यांना भोजनासाठी निमंत्रित केले होते. मात्र, सोमवारी लालकृष्ण अडवाणी पूर्वनियोजित दौऱयानुसार गांधीनगरच्या दौऱयावर असल्यामुळे हा कार्यक्रम दोन दिवस पुढे ढकलण्यात आला.
आंध्र प्रदेश पुनर्रजना विधेयक २०१३ मध्ये भाजपने सुचविलेल्या सुधारणांना केंद्र सरकारने होकार दिला असल्याचे समजते. सीमांध्र भागातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपने सुचविलेल्या सुधारणांचा सरकार निश्चित विचार करेल, असे आश्वासन डॉ. सिंग बुधवारी नियोजित भेटीवेळी भाजपच्या नेत्यांना देण्याची शक्यता आहे.