तेलंगण सरकार तेथील राज्य सचिवालयात येणाऱ्या पत्रकारांच्या हालचालींवर र्निबध घालण्याचा विचार करीत असून या प्रस्तावावर पत्रकारांच्या सल्ल्यानेच निर्णय घेतला जाईल असे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी सांगितले.
मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी वार्ताहरांना सांगितले की, अनेक महिन्यांपासून तक्रारी येत असून त्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. उद्या प्रेस अ‍ॅकॅडमीत पत्रकार मित्रांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
सध्या पत्रकारांच्या सचिवालय भेटीची प्रक्रिया अनियंत्रित आहे व त्याबाबत आम्ही पत्रकार मित्रांच्या सल्ल्याने निर्णय घेणार आहोत. पत्रकारांच्या सचिवालय प्रवेशासाठी काहीतरी यंत्रणा असली पाहिजे असे आम्हाला वाटते. सरकारचा यामागील हेतू अलोकशाही स्वरूपाचा नाही. त्याबाबत माध्यमांचा सल्ला घेतला जाईल व नंतरच शिस्त किंवा काही नियंत्रणे घातली जातील असे ते म्हणाले.
सरकार सचिवालयाच्या संकुलात पत्रकारांच्या अर्निबध वावरावर नियंत्रणे आणणार आहे अशा आशयाच्या बातम्या आल्या आहेत त्यावर तेलंगणाचे मुख्यमंत्री राव यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. या बातम्यात असे म्हटले होते की, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची सचिवालयात गर्दी होत असल्याने प्रशासकीय कामात अडथळे येत आहेत. त्यामुळे काही र्निबध असणे आवश्यक आहे असे सरकारला वाटते.
तेलंगणाचे काँग्रेस अध्यक्ष पोन्न्ोला लक्ष्मय्या यांनी सांगितले की, एक प्रकारे ही हुकूमशाहीच असून प्रसारमाध्यमांवर नियंत्रण आणणेच आहे.