तेलंगणामधील सिरसिला येथील नगरपालिका अध्यक्ष समला पवनी यांना आपल्या लाच घेण्यासंबंधीच्या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजीनामा द्यावा लागला आहे. राजीनामा देण्यामागे त्यांचं वैयक्तिक कारण असल्याचा दावाही केला जात आहे. राजीनामा देत असताना त्यांनी मंत्री के टी रामा यांचे आभार मानले. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी समला पवनी यांच्या एका वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. तेलंगणा शहरात नागरी प्रकल्पांना मंजुरी देण्यासाठी लाच घेणं सामान्य गोष्ट आहे असं त्या बोलल्या होत्या. यावेळी त्यांनी एक मंत्री लाच घेत असल्याचेही संकेत दिले. मात्र त्यांनी त्या मंत्र्याचं नाव घेतलं नाही. स्थानिक प्रसारमाध्यमांना त्याची कल्पना असल्याचं त्या बोलल्या. नगरसेवक ठेकेदारांकडून टक्केवारी घेतात आणि हे नेहमीच चालतं असं त्या म्हणाल्या. समला यांचा प्रसारमाध्यमांशी बातचीत करतानाचा हा व्हिडीओ शनिवारी व्हायरल झाला होता.

समला यांनी म्हटलं की, ‘आमचे मंत्री म्हणतात की आम्हाला म्हणजे सरकारी अधिका-यांना काही मिळत नाही. मी तुम्हा पत्रकारांना काही गोष्टींची माहिती देऊ इच्छिते. जर तिथे एक कंत्राटदार असेल तर एक ते तीन टक्के कमिशन मिळतं. याच आधारे जर त्यांनी काम केलं आणि काही लाच नगरसेवकांना दिली तर सर्व काम केलं जातं’. पण नंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत लोकांचं काम पुर्ण करण्यासाठी नगरसेवक पैसे घेत असतील तर त्यात काही गैर नाही असा बचाव करण्याचा प्रयत्न केला. त्या बोलल्या की, ‘निवडणुकीदरम्यान नगरसेवक म्हणून खूप खर्च केला जातो. त्यामुळे कंत्राटदारांनी किमान एक ते दोन टक्के दिले पाहिजते. आम्ही सर्व वॉर्डात फिरत असतो, त्यामुळे आम्हाला पैसे देणं कंत्राटदारांतं कर्तव्य आहे’.

हे फक्त सिरसिलामध्ये होत नसून, राज्यातील सर्व नगरपालिकांमध्ये हीच परिस्थिती असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान समला यांच्या वक्तव्यानंतर विरोधकांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली असून, त्या मंत्र्याचं नाव जाहीर करण्याची मागणी केली आहे. आपल्या वक्तव्यामुळे समला यांना राजीनामा द्यावा लागला आहे.