तेलंगणामधील भ्रष्टाचार विरोधी पथकाने तहसीलदार व्ही लावण्या यांच्या घरावर धाड टाकत कारवाई केली. या कारवाईत त्यांनी ९३.५ लाखांची रोख रक्कम आणि ४०० ग्रॅम सोनं जप्त केलं. व्ही लावण्या यांच्या हैदराबाद येथील हयाथनगर परिसरात असणाऱ्या घरातून हे घबाड जप्त करण्यात आलं. काही दिवसांपुर्वी ग्राम महसूल अधिकाऱ्याला शेतकऱ्याकडून चार लाखांची लाच घेताना अटक करण्यात आल्यानंतर आता ही कारवाई करण्यात आली आहे. जमिनीच्या कागदपत्रांमधील चूक दुरुस्त करण्यासाठी ग्राम महसूल अधिकाऱ्याने ही लाच मागितली होती.

शेतकऱ्याला आठ लाखांची लाच मागण्यात आली होती. यापैकी पाच लाख रुपये तहसीलदारांसाठी तर तीन लाख रुपये ग्राम महसूल अधिकाऱ्यासाठी होते. पैसे हातात येताच ग्राम महसूल अधिकाऱ्याने तहसीलदारांशी संपर्क साधला. यामुळे भ्रष्टाचार विरोधी पथकाने त्यांची चौकशी केली.

व्ही लावण्या यांनी आपल्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळले होते. यानंतर भ्रष्टाचार विरोधी पथकाने त्यांच्या घरावर धाड टाकली. यादरम्यान एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये एक शेतकरी लावण्या यांच्या पाया पडत आपली विनंती मान्य करा असं गाऱ्हाणं मांडत होता. मिळालेल्या माहितीनुसार, या शेतकऱ्याचं नाव भास्कर असून ग्राम महसूल अधिकाऱ्याने पासबुक देण्यासाठी त्याच्याकडे ३० हजारांची लाच मागितली होती.

भास्कर यांना त्यांच्या रेकॉर्डमध्ये काही चुका आढळल्या होत्या. चुका दुरुस्त करण्यासाठी त्यांच्याकडे लाखांची लाच मागण्यात आली होती. यानंतर त्यांनी भ्रष्टाचार विरोधी पथकाकडे तक्रार केली. विशेष म्हणजे लावण्या यांना दोन वर्षांपुर्वी तेलंगणा सरकारकडून सर्वोत्तम तहसीदार हा पुरस्कार मिळाला होता. त्यांचे पती हैदराबाद महापालिकेत अधीक्षक पदावर असल्याची माहिती आहे.