हैदराबाद : तेलंगण या नव्याने निर्माण करण्यात आलेल्या राज्यात तेलंगण राष्ट्र समितीने ८७ जागांवर बाजी मारून पुन्हा बहुमत पटकावले आहे. पक्षाचे सर्वेसर्वा के.चंद्रशेखर राव यांच्या लोकप्रियतेने निर्माण झालेल्या गुलाबी लाटेत भाजप व काँग्रेसप्रणीत महाआघाडीचा धुव्वा उडाला. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनाही पराभवाचा जोरदार फटका सहन करावा लागला आहे.

तेलंगण राष्ट्र समितीचा मित्र पक्ष असलेल्या एआयएमआयएमचे नेते असाउद्दीन औवेसी यांनी बहादुरपुरा येथून त्यांचे प्रतिस्पर्धा महंमद मोझाम खान यांचा पराभव केला. असदुद्दीन यांचे बंधू अकबरुद्दीन यांनी चांद्रयानगुट्टा येथे लागोपाठ पाचव्यांचा विजय संपादन केला आहे.

तेलंगण राष्ट्र समितीच्या राज्यातील कार्यालयांमध्ये एकच जल्लोष करण्यात आला. तेलंगण भवन या पक्षाच्या हैदराबादेतील मुख्यालयात आनंदोत्सव साजरा झाला. ढोलताशांच्या निनादात कार्यकर्त्यांनी मिरवणुका काढून फटाके फोडून मिठाई वाटली.

तेलंगणातील निवडणुकीत भाजपने पक्षाध्यक्ष अमित शहा व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना प्रचारात उतरवूनही त्याचा काहीच उपयोग झाला नाही. या निवडणुकीत तेलंगण राष्ट्रीय समिती व प्रजा कुतामी (महाआघाडी) यांच्यात सामना होता. काँग्रेसप्रणीत महाआघाडीत तेलगु देसम, तेलंगण जन समिती, भाक प यांचा समावेश होता. २०१४ मध्ये एप्रिल महिन्यात तेलंगणमध्ये पहिल्यांदा निवडणुका झाल्या होत्या नंतर आता या दुसऱ्या निवडणुका होत्या. सुरुवातीला भाजप नेते के. लक्ष्मण यांनी केसीआर यांच्या तेलंगण राष्ट्रीय समितीशी भागीदारी करण्याचा प्रस्ताव दिला होता पण तो पक्षाचा प्रस्ताव नाही, असे सांगून लक्ष्मण यांचीच कानउघाडणी करण्यात आली होती.

महाकुतामी म्हणजे महाआघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल नरसिंहन यांची भेट घेऊन खंडित जनमत असल्यास आपल्यालाच सरकार बनवण्याची संधी प्रथम मिळावी, अशी विनंती केली होती. असाउद्दीन ओवैसी यांच्या ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन या पक्षाने आठ जागा लढवल्या होत्या. त्या सर्व हैदबादेतील असून या पक्षाने तेलंगण राष्ट्रीय समितीला पाठिंबा दिला होता.

तेलंगण राष्ट्रीय समितीने निवडणूक जाहीरनाम्यात पेन्शन योजना, आरक्षण, वन जमिनींचे वाद सोडवणे, सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय वाढवणे, बेरोजगारी दूर करणे  अशी आश्वासने दिली होती. प्रजा कुतामी म्हणजेच महाकुतामी आघाडीने १० कलमी जाहीरनाम्यात रोजगार, शेती. शिक्षण, आरोग्य, प्रशासन बदल, हुतात्मा पार्क हे मुद्दे मांडले होते. गेल्या वेळी तेलंगण राष्ट्रीय समिती ६३, काँग्रेस २१, तेलगू देसम १५, एआयएमआयएम ७, भाजप ५ व अपक्ष ८ असे बलाबल होते.

नवे प्रादेशिक नेतृत्व

विधानसभा मुदतपूर्व बरखास्त करून निवडणुकांना सामोरे जाण्याचा के. चंद्रशेखर राव यांचा डाव यशस्वी ठरला.चंद्रशेखर राव यांचा राजकीय प्रवास काँग्रेस पक्षातून सुरू झाला. एन. टी. रामाराव यांच्या नेतृत्वाखाली तेलुगु देसमचा प्रभाव निर्माण झाल्यावर चंद्रशेखर राव यांनी या पक्षात उडी मारली. रामाराव आणि नंतर चंद्राबाबू नायडू यांच्या मंत्रिमंडळात काम केले. चंद्राबाबू यांनी त्यांना नंतर विधानसभेच्या उपाध्यक्षपदी संधी दिली. २०००च्या आसपास स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या मागणीसाठी जोर धरू लागला. चंद्रशेखर राव यांनी तेलुगु देसमचा राजीनामा देऊन तेलंगणा राष्ट्र समितीची स्थापना केली. २००९ मध्ये त्यांच्या ऐतिहासिक उपोषणानंतरच तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने स्वतंत्र राज्याच्या निर्मितीचे आश्वासन दिले. त्यांनी आपले नेतृत्व प्रस्थापित केले.

केसीआर कुटुंबाला कौल

तेलंगण राष्ट्र समिती विजयी होत असतानाच पक्षाचे सर्वेसर्वा के चंद्रशेखर राव, त्यांचे पुत्र के. टी. रामाराव तसेच त्यांचे पुतणे टी हरीश राव विजयी झाले. विशेष म्हणजे प्रचारात के. चंद्रशेखर राव यांच्यावर घराणेशाहीचा आरोप झाला होता. मात्र मतदारांनी केसीआर यांच्या बाजूने कौल दिला.

तेलंगणमधील जनतेने जो कौल दिला आहे त्याचा आम्ही आदर करतो. मात्र, पाच राज्यांतील निकाल पाहता जनता भाजपला पर्याय शोधत आहे हेच दिसते. या निकालातून भाजपविरोधी भक्कम पर्याय निर्माण होईल.

– चंद्राबाबू नायडू, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री