प्रलंबित विधेयके मंजूर करण्यासाठी सर्वपक्षीय सदस्यांनी सहकार्य करावे… पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या या आवाहनाला प्रतिसाद न देता तेलंगणाच्या मुद्द्यावरून आंध्र प्रदेशमधील खासदारांनी गोंधळ घातल्यामुळे संसदेच्या पहिल्या दिवसाचे कामकाज बुधवारी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यावर लगेचच वेगळ्या तेलंगणाच्या मुद्द्यावरून खासदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. १५व्या संसदेचे हे अखेरचे अधिवेशन आहे. कृपया सदस्यांनी शांत राहावे, असे आवाहन लोकसभेच्या अध्यक्षा मीरा कुमार यांनी केले. मात्र, सदस्य त्यांचे ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. यानंतर सुरुवातीला कामकाज १२ वाजेपर्यंत आणि नंतर पुन्हा गोंधळ सुरूच राहिल्याने कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. राज्यसभेतही सदस्य गोंधळ घालत असल्यामुळे कामकाज सुरुवातीला १२ वाजेपर्यंत आणि नंतर पुन्हा दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.