जगभरात थैमान घालणाऱ्या करोना व्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर आयर्लंडचे मराठी वंशाचे पंतप्रधान डॉ. लिओ वराडकर आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांमध्ये फोनवरुन चर्चा झाली. यावेळी, करोनाविरोधातील लढाईत आयर्लंडमधील आरोग्य सेवेमध्ये भारतीय कर्मचाऱ्यांच्या मोठ्या योगदानाबाबत वराडकर यांनी मोदींचे आभार मानले.

बुधवारी(दि.२२) सकाळी दोन्ही नेत्यांमध्ये फोनवर चर्चा झाली. “करोना व्हायरसमुळे आयर्लंड आणि भारतावर होणाऱ्या परिणामांबाबत आज सकाळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केली”, अशी माहिती वराडकर यांनी ट्विटरद्वारे दिली. चर्चेदरम्यान, आयरिश आरोग्य सेवेमध्ये भारतीय कर्मचार्‍यांच्या मोठ्या योगदानाबद्दल मोदींचे आभार मानल्याचेही त्यांनी ट्विटरद्वारे सांगितले. याशिवाय फार्मा आणि औषध क्षेत्रात अधिक सहकार्याबाबतही चर्चा झाल्याचं वराडकर यांनी ट्विटमध्ये नमूद केलं.

करोनाचा वाढत्या फैलावामुळे पेशाने डॉक्टर असलेले लिओ वराडकर स्वतः रुग्णसेवा करत आहेत. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याबाबत ट्विट करुन माहिती दिली. “करोना व्हायरस महामारीबाबत आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांच्यासोबत चर्चा झाली. आम्ही आरोग्य, विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदारी अधिक मजबूत करुन करोना संकट संपल्यानंतरच्या आव्हानांचा एकत्र सामना करु” असे मोदींनी ट्विटरद्वारे म्हटले आहे.

दरम्यान, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स यांनीही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकार करोनाचा प्रादूर्भाव कमी होण्यासाठी जी पावलं उचलत आहे, त्याचं बिल गेट्स यांनी पत्र लिहू कौतुक केलं आहे. “करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी भारत सरकारने जी पावलं उचलली आहेत त्याचं आणि तुमच्या नेतृत्वाचं मी खरंच कौतुक करतो. देशातील हॉटस्पॉट ओळखून करोना बाधित रुग्णांना क्वारंटाइन करणं, लॉकडाउन जाहीर करणं, आरोग्य यंत्रणेला पाठींबा देण्यासाठी उचललेली पावलं हे प्रशंसनीय आहे. रिसर्च आणि डेव्हलपमेंट यासोबतच डिजीटल इनोव्हेशन या गोष्टीवरही सरकारने चांगला भर दिला आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी भारत सरकार डिजीटल प्रणालीचा योग्य वापर करत आहे याचं मला कौतुक आहे. करोना विषाणूसंदर्भात सर्व वैद्यकीय सुविधेची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेलं आरोग्य सेतू अ‍ॅप, त्यावर करोना बाधित क्षेत्राची मिळणारी माहिती या सर्व गोष्टी दाद देण्यासारख्या आहेत”, अशा शब्दांमध्ये गेट्स यांनी पंतप्रधान मोदी यांचं कौतुक केलं आहे.