तीन दशकांतली डिसेंबरची सर्वात थंड रात्र

जम्मू-काश्मीरची उन्हाळी राजधानी असलेल्या श्रीनगर शहरात गुरुवारी रात्री उणे ७.६ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाल्याने गेल्या तीन दशकांत डिसेंबर महिन्यातील ही सर्वात थंड रात्र ठरली. काश्मीर खोरे आणि लडाखच्या बहुतांश भागात तापमान गोठणबिंदूच्या खाली असल्याने अनेक तळी आणि जलवाहिन्या गोठल्या.

यापूर्वी ७ डिसेंबर १९९० रोजी श्रीनगरमध्ये उणे ८.८ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली होती. हवामान खात्याच्या एका अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार, खोऱ्यातील अनेक ठिकाणी रात्रीच्या विक्रमी कमी तापमानाची नोंद करण्यात आली.

श्रीनगरमध्ये बुधवारी रात्रीच्या उणे ६.७ अंश सेल्सिअस इतक्या तापमानापेक्षा पारा एका अंशाने घसरला. गुलमर्ग व लेह या दोन ठिकाणीच बुधवारी किमान तापमानात वाढ झाली, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

दक्षिण काश्मिरातील काझीगुंड येथे आदल्या रात्रीच्या उणे ५.९ अंश सेल्सिअस तापमानात घट होऊन ते उणे ६.१ अंश सेल्सिअसपर्यंत गेले. ही या शहरातील या हंगामातील सर्वात थंड रात्र, तर डिसेंबर महिन्यातील गेल्या आठ वर्षांतील सर्वात थंड रात्र होती. नजीकच्या कोकेरनाग शहरातही आदल्या रात्रीच्या उणे ५.४ अंश सेल्सिअस तापमानात घट होऊन ते उणे ६.२ सेल्सिअसपर्यंत पोहोचले.

काश्मीरमधील तापमान

  • राज्यात नोंद झालेले किमान तापमान असे : कुपवाडा (उणे ६.७), पहलगाम (उणे ८.३), गुलमर्ग (उणे ९), लेह (उणे ८.४), कारगिल (उणे १६.२ अंश सेल्सिअस).

तलाव गोठले

  • प्रसिद्ध दाल सरोवरासह अनेक तलाव गोठले आहेत. श्रीनगरमधील अनेक निवासी वस्त्या आणि खोऱ्यातील इतर शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्याही गोठल्या आहेत.