पॅरिस : पॅरिस व लंडनसह युरोपमधील अनेक शहरांनी गुरुवारी आजवरचे सर्वात जास्त अथवा जवळजवळ विक्रमी तापमान गाठले असून, यावर्षीच्या उन्हाळ्यातील उष्णतेच्या दुसऱ्या लाटेने युरोप खंडाला भाजून काढले आहे.
जगाच्या अनेक भागांमध्ये हे नवे सामान्य तापमान ठरू शकते, असा इशारा हवामान शास्त्रज्ञांनी दिला आहे. मात्र जेथे वातानुकूलन दुर्मीळ आहे, असा युरोप या आठवडय़ात या भागाला भाजून काढणाऱ्या तापमानाचा सामना करण्यासाठी सज्ज नाही.
या तापमानापासून दिलासा मिळवण्यासाठी पर्यटकांनी कारंज्यांचा सहारा घेतला; तर या उन्हाचा सर्वाधिक तडाखा बसलेले वृद्ध, आजारी आणि निराधार लोकांना मदत करण्यासाठी अधिकारी व स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला. ब्रिटन व फ्रान्समध्ये रेल्वेगाडय़ा रद्द करण्यात आल्या आणि फ्रेंच अधिकाऱ्यांनी पर्यटकांना घरीच थांबण्याचे आवाहन केले.
युरोपमध्ये एकामागोमाग एक तापमानाचे विक्रम मोडले जात आहेत. गुरुवारी दुपारी पॅरिसमधील यापूर्वीचा १९४७ सालचा ४०.४ अंश सेल्सिअसचा विक्रम मोडला जाऊन ४०.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.
लंडनचे तापमान ३९ अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता आहे.
जर्मनी, नेदरलँड, लक्झेम्बर्ग आणि स्वित्र्झलड येथेही तापमान ४० अंश सेल्सिअसचा पारा ओलांडू शकते. बेल्जियममध्ये १८३३ साली तापमानाची नोंद ठेवण्यास सुरुवात झाल्यानंतर पहिल्यांदाच तापमापकातला पारा ४० अंशांच्या पुढे गेल्याचे मेट्रॉलॉजिकल इन्स्टिटय़ूटने सांगितले. पूर्व बेल्जियममधील अँजेलूर येथे ४०.२ अंश सेल्सिअस हे आजवरचे विक्रमी तापमान नोंदवण्यात आले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 26, 2019 5:04 am