राजस्थानमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजपाने एकमेकांवर टीकेची झोड उठवली असून धर्म, गाय मुद्द्यांवरुन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेसवर टीका करताना निवडणूक आली की यांचे नेते मंदिरात धाव घेतात, पण भाजपासाठी हा संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे असं वक्तव्य केलं.

‘काँग्रेस नेते निवडणूक जवळ आली की मंदिरांमध्ये जाऊन प्रार्थना सुरु करतात. याआधी ते कधीही मंदिरात जाताना दिसत नाहीत. मंदिर आणि गाय हा काँग्रेससाठी निवडणुकीचा मुद्दा असू शकतो, पण भाजपासाठी हा निवडणुकीचा मुद्दा किंवा स्टंट नाही. हा आमच्या संस्कृती आणि परंपरेचा अविभाज्य भाग आहे’, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. बनसूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हिंदुत्त्व किती समजतं यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर लगेचच राजनाथ सिंह यांचं हे वक्तव्य समोर आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंदू असले तरी त्यांना हिंदुत्वाबद्दल काहीच माहीत नाही. गीतेत काय म्हटले आहे हे सर्वांनाच माहित आहे. पण मोदींना हिंदुत्वाबद्दल माहिती नाही. ते नेमके कोणत्या प्रकारचे हिंदू आहेत ?, असा सवाल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी विचारला. सर्जिकल स्ट्राइकचा निर्णय सैन्याचा होता. पण मोदींनी त्याचे श्रेय घेऊन राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला, असंही त्यांनी म्हटलं होतं.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी उदयपूरमधील व्यापारी वर्गाशी संवाद साधला. ते म्हणाले, खासगी शिक्षण संस्था चांगल्या असतात हा एक गैरसमज आहे. सरकारच्या मदतीशिवाय आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात पुढे जाता येणार नाही. मनमोहन सिंग सरकारच्या काळात तीन वेळा सर्जिकल स्ट्राइक झाले होते. सैन्याचे अधिकारी ज्या वेळी मनमोहन सिंग यांच्याकडे गेले त्यावेळी त्यांनी सर्जिकल स्ट्राइकबाबत गोपनीयता बाळगावी अशी विनंती केली होती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्याच्या क्षेत्रात प्रवेश केला. सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांनी केला. उत्तर प्रदेशमध्ये मोदींना पराभव दिसत होता. त्यामुळे मोदींनी सैन्याच्या कारवाईचा राजकीय लाभ घेतला, असेही त्यांनी सांगितले.

200 सदस्य असणाऱ्या राजस्थान विधानसभेसाठी 7 डिसेंबरला मतदान होणार आहे. 11 डिसेंबरला निकाल जाहीर होईल.