कर्नाटकातील राजूस्वामी उर्फ राजू या शेतकऱ्याने बांधलेले प्रेममंदिर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या मंदिरात राजू यांनी भगवान शंकर व अन्य देवतांसोबतच चक्क पत्नीलाही स्थान दिले आहे. राजू यांनी पत्नीची मुर्ती तयार केली असून ते गेली १२ वर्षे दररोज पत्नीची पुजा करत आहेत.

येलंदूर तालुक्यातील कृष्णपुरा गावात राहणाऱ्या राजू यांची गावात २ एकरची शेती आहे. राजू यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला विवाह कसा झाला आणि मंदिर का बांधले याची माहिती दिली. ते सांगतात, मी  बहिणीच्या मुलीशीच लग्न केले. आई-वडिलांचा विरोध होता, पण नंतर त्यांचा विरोध मावळला. माझी बहीण व भावोजींनी या लग्नाला विरोध केला नाही. लग्नानंतर काही महिन्यांनी माझी पत्नी राजम्माने मला तिचे स्वतःचे मंदिर असावे अशी इच्छा व्यक्त केली होती. पण मंदिर बांधण्यापूर्वीच तिचे निधन झाले. मग या मंदिरात मी तिला देखील स्थान देण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले. २००६ मध्ये या मंदिराचे काम पूर्ण झाले असून गेली १२ वर्षे राजू दररोज अन्य देवीदेवतांसह पत्नीची देखील पूजा करतात. मंदिरात पत्नीला स्थान देताना काहींनी विरोध दर्शवला, पण त्याकडे दुर्लक्षच केले, असे राजू यांनी नमूद केले.

माझ्या पत्नीला तिच्या मृत्यूची पूर्वकल्पनाच आली असावी. तिच्याकडे विशेष शक्तीच होती. ती दिवसरात्र फक्त मंदिराचा विचार करायची. ती खूपच धार्मिक होती आणि म्हणूनच मी हे मंदिर बांधले, असे ते सांगतात. कृष्णपुरालगच्या अन्य गावांमध्येही हे प्रेममंदिर आता प्रसिद्ध झाले आहे. अन्य गावांमधील ग्रामस्थ या मंदिरात आवर्जून दर्शनाला येतात.