बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी देवळात जाऊन प्रार्थना केल्यानंतर त्या देवळाची सफाई करण्यात आली हा प्रकार लाजिरवाणा असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी दोषी असलेल्यांना अटक करण्याचे आदेश पोलिसांना का देण्यात आले नाहीत, असा आश्चर्ययुक्त सवालही पासवान यांनी केला.
अस्पृश्यता हा देशात गुन्हा आहे, हा प्रकार सर्वसामान्य नागरिकाच्या बाबतीतही घडू नये. मात्र आपल्या भेटीनंतर देवळाची सफाई करण्यात आली असे मुख्यमंत्रीच सांगत असतील तर त्याहून अधिक लाजिरवाणी बाब कोणती, असा सवाल पासवान यांनी केला. मांझी यांनी पोलिसांना त्वरित पाचारण करून त्या ठिकाणी छापा टाकण्याचे आदेश द्यावयास हवे होते आणि दोषींना कारागृहात पाठवावयास हवे होते, असेही पासवान म्हणाले.
मधुबनी येथील एका देवळाला भेट दिल्यानंतर त्या देवळाची साफसफाई करण्यात आली आणि त्यानंतर शुद्धीकरण करण्यात आले, असे मांझी यांनी रविवारी सांगितले. गेल्या महिन्यात झालेल्या पोटनिवडणुकीच्या वेळी हा प्रकार घडला, असेही मांझी म्हणाले.
मांझी हे महादलित वर्गातील आहेत, महादलितांबद्दलचा पक्षपातीपणा तळागाळात रुजला आहे, आपणही त्याचे बळी आहोत, शासकीय यंत्रणेतही हा प्रकार आहे, असे मांझी यांनी म्हटले आहे. या प्रकारची राजकीय तसेच सर्वच क्षेत्रांतून तीव्र निषेध करण्यात येत आहे.
मंदिराच्या शुद्धीकरणाच्या चौकशीचे आदेश
बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी बिहारच्या मधुबनी जिल्ह्य़ातील देवळात प्रार्थना केल्यानंतर त्या देवळाचे शुद्धीकरण करण्यात आल्याच्या प्रकाराची मांझी यांनी गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.या प्रकरणी कोणी दोषी आढळल्यास त्याच्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असा इशारा मांझी यांनी दिला आहे. मात्र देवळातील पुरोहिताने या बाबतच्या आरोपांचे जोरदार खंडन केले आहे.