22 October 2020

News Flash

मंदिरांवर चर्चा करुन रोजगार निर्मिती होणार नाहीये – सॅम पित्रोदा

'मी जेव्हा कधी आपल्या देशात मंदिर, धर्म, जात, देव यांच्यासंबंधी होणारे वादविवाद पाहतो, तेव्हा मला भारताची चिंता वाटते'

सॅम पित्रोदा (संग्रहित छायाचित्र)

धर्मामुळे उद्या कोणतीही रोजगार निर्मिती होणार नाहीये, फक्त विज्ञानच भविष्याची निर्मिती करु शकतं असं वक्तव्य भारताच्या मोबाइल क्रांतीचे जनक सॅम पित्रोदा यांनी केलं आहे. मंदिर, देव यासंबंधी होणाऱ्या चर्चांवर बोलताना त्यांनी हे मत मांडलं. गांधीनगर येथील एका विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं. यावेळी त्यांनी जेव्हा कधी रोजगारासंबंधी चर्चा केली जाते, तेव्हा त्याला लगेच राजकीय रुप दिलं जातं असंही म्हटलं.

‘मी जेव्हा कधी आपल्या देशात मंदिर, धर्म, जात, देव यांच्यासंबंधी होणारे वादविवाद पाहतो, तेव्हा मला भारताची चिंता वाटते. उद्या मंदिरं रोजगार निर्मिती करणार नाहीयेत. फक्त विज्ञानच भविष्य घडवू शकतं’, असं सॅम पित्रोदा बोलले आहेत. पण सार्वजनिक ठिकाणी विज्ञानावर फार कमी चर्चा केली जाते अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

‘दुसरीकडे जेव्हा कधी रोजगारासंबंधी चर्चा होते, तेव्हा त्याला नेहमी एक राजकीय बाजू असते’, असंही ते म्हणाले. ‘देशातील तरुणांना लोकांकडून आणि खासकरुन राजकारण्यांकडून भरकटवलं जात आहे. अनावश्यक गोष्टी सांगून त्यांना चुकीच्या मार्गावर ढकलले जात आहे’, असा आरोप यावेळी त्यांनी केला.

रोजगार निर्मितीसाठी आपल्या देशात योग्य दृष्टीकोन नसल्याचंही ते म्हणाले आहेत. ‘आपल्या देशात अनावश्यक गोष्टींवर प्रमाणाबाहेर चर्चा केली जाते, ज्याची मला काळजी वाटते. आपण अजिबात महत्व नसलेल्या गोष्टींवर चर्चा करतो, तरुणांना चुकीचं मार्गदर्शन देतो, त्यांना चुकीच्या मार्गावर नेतो, त्यांना आपण तथ्य सांगत नाही, त्यांच्याशी खोटं बोलतो’, असं ते म्हणाले.

‘याचं खूप दु:ख होतं. पण अनेक नेते अशा गोष्टी बोलत असतात ज्यांना काही अर्थ नसतो. कारण ते दुर्लक्षित असतात. आपल्या आयुष्यात भाषण देण्याव्यतिरिक्त त्यांनी काहीच केलेलं नसतं. तरुणांना मार्गदर्शन देण्यासाठी ते योग्य नाहीत’, असं सॅम पित्रोदा बोलले आहेत. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना आपले पालक, शिक्षक आणि राजकारण्यांपेक्षा वेगळ्या दृष्टीने विचार करण्याचा सल्ला दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2018 8:20 am

Web Title: temples wont create jobs tomorrow says sam pitroda
Next Stories
1 परराज्यातून येणाऱ्या माशांत फॉर्म्यलिन असल्याची अफवा
2 इतर कुठल्या चार वर्षांत एवढी मोठी प्रगती झाली ते दाखवा
3 मराठी बोलणाऱ्यांची संख्या ८.३० कोटी
Just Now!
X