केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षांत प्राप्तिकरदात्यांची संख्या १ कोटींनी वाढवण्यास सांगितले असून हे सर्व नवीन करदाते असावेत अशी अपेक्षा ठेवली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची बैठक याबाबत झाली असून पुणे विभागात १० लाख नवीन करदात्यांना प्राप्तिकराच्या जाळ्यात घेण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. देशातील सर्व राज्यांत हे उद्दिष्ट मोठे आहे. मुंबईत ६.२३ लाख नवीन करदाते गोळा करण्यास सांगितले आहे.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने विभागीय उद्दिष्टे दिली असून पुण्यात १०.१४ लाख नवीन प्राप्तिकर दाते आणण्यास सांगितले आहे. ईशान्येकडील राज्ये, काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरयाणा यांना ९.३० लाख नवीन करदाते आणण्यास सांगितले आहे. आंध्र प्रदेश व तेलंगणातून ७.९३ लाख नवीन करदाते गोळा करण्याचे उद्दिष्ट आहे. गुजरातसाठी ते ७.८६ लाख, तर तामिळनाडूसाठी ७.६४ लाख इतके आहे. पश्चिम बंगाल व सिक्कीमसाठी ६.२३ लाख, तर राजधानीसाठी ५.३२ लाख असे आहे. कर विभागाने १८ भागात उद्दिष्टे ठरवून दिली आहेत.
व्यापारी संघटना व व्यावसायिक संस्था यांच्या सभा घेऊनही हे उद्दिष्ट साध्य होण्याबाबत साशंकता आहे. तांत्रिक व मानवी पातळीवर माहिती गोळा करून कर बुडवणाऱ्यांचा शोध घेण्यास सांगण्यात आले आहे. देशात दर महिन्याला २५ लाख नवीन करदाते शोधून काढावेत, अशी सरकारची अपेक्षा असल्याचे प्रत्यक्ष कर मंडळाकडून सांगण्यात आले.