साहित्य अकादमीचा दावा
देशात असहिष्णुता असल्याचे कारण देत अनेक साहित्यिकांनी आपले पुरस्कार परत केले होते. मात्र नयनतारा सेहगल यांच्यासह काही साहित्यिक पुरस्कार घेण्यासाठी राजी झाले आहेत, असा दावा साहित्य अकादमीने केला आहे. किमान दहा लेखकांनी पुरस्कार परत घेण्याची तयारी दर्शवल्याचे सांस्कृतिक मंत्रालयाच्या सूत्राने स्पष्ट केले आहे.
साहित्य अकादमीकडून अनेक साहित्यिकांना पुरस्कार परत पाठवण्यास सुरुवात झाली आहे. नयनतारा सेहगल यांना पुरस्कार परत पाठवण्यात आला आहे. नंद भारद्वाज यांनीही पुरस्कार घेण्यास सहमती दर्शवल्याचे साहित्य अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद तिवारी यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केले. तसेच ऑक्टोबरमध्ये अकादमीच्या बैठकीत झालेल्या ठरावाची प्रत साहित्यिकांना पाठवली जात आहे. पुरस्कार परत घेण्याची कोणतीही तरतूद घटनेत नसल्याचे त्यांनी सांगितले. कन्नड लेखक कलबुर्गी यांची हत्या तसेच दादरीतील घटनेनंतर देशातील जातीय वातावरणाचा निषेध करत गेल्या काही महिन्यांत जवळपास ४० साहित्यिकांनी अकादमीकडे आपले पुरस्कार परत दिले आहेत.
२३ ऑक्टोबरला साहित्य अकादमीने एका ठरावाद्वारे राज्य व केंद्र सरकारला दादरीसारख्या घटना टाळण्यासाठी पावले उचलावीत असे आवाहन ठरावाद्वारे केले होते. लेखकांनी पुरस्कार परत घेण्याचे आवाहन केले होते. कलबुर्गी यांच्या हत्येचा कठोर शब्दांत अकादमीने निषेध केला होता.