पाकिस्तानातील दहा दूरचित्रवाणी वाहिन्यांना भारतीय व परकीय भाषेतील जास्त कार्यक्रम दाखवल्याबद्दल १ कोटी रूपये दंड करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या माध्यम नियंत्रण मंड़ळाने या वाहिन्यांना पत्रे पाठवून दंड भरण्यास सांगितले आहे, शिवाय यापुढे भारतीय भाषातील किंवा परदेशी भाषातील कार्यक्रम जास्त प्रमाणात दाखवला तर याद राखा, असा इशाराही दिला आहे.
माहिती प्रसारण व राष्ट्रीय वारसा खात्याच्या (पेमरा) काही नियमावलींचा आधार घेऊन हा दंड आकारण्यात आला आहे. पाकिस्तानात रोज प्रमाणाबाहेर भारतीय व परकीय भाषांतील कार्यक्रम दाखवले जातात. पेमराच्या देखरेख प्रणालीनुसार रोज कुठल्या वाहिन्या कुठले कार्यक्रम, कुठल्या जाहिराती दाखवतात यावर देखरेख केली जाते. खासगी पाकिस्तानी दूरचित्रवाणी वाहिन्याना १० टक्के परदेशी कार्यक्रम दाखवण्याची परवानगी आहे. त्या १० टक्क्य़ातील ६० टक्के भारतीय किंवा इतर भाषातील तसेच १० टक्के इंग्रजीतील कार्यक्रम दाखवण्यास अनुमती आहे. पाकिस्तानमध्ये दंड करण्यात आलेल्या वाहिन्यात हम टीव्ही, ऑक्सिजन टीव्ही, प्ले टीव्ही, कोहिनूर एंटरटेनमेंट, एनटीव्ही एंटरटेनमेंट, जीएक्सएम एंटरटेनमेंट, जलवा एंटरटेनमेंट यांचा समावेश आहे.
पाकिस्तानात धार्मिक द्वेषभावना भडकवण्यास कारणीभूत ठरत असलेली सोशल मीडिया संकेतस्थळे , मोबाईलधारक व संबंधित कंपन्यांवर कारवाईचे आदेश पाकिस्तान सरकारने दिले आहेत. माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय व फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी यांनी सांगितले की, धार्मिक द्वेष पसरवणारा आशय प्रसारित करू नये. जी संकेतस्थळे, मोबाईलधारक असे करीत असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचा आदेश एफआयएला देण्यात आला आहे.रावळपिंडी येथे आशुरा मिरवणुकीत १५ नोव्हेंबरला हिंसाचारात १० ठार तर ८० जण जखमी झाले होते. त्यावेळी अनेक चित्रे ही सोशल मीडियातून प्रसारित झाली होती. आधीच्या काही घटनांची चित्रेही त्यात वापरली होती.बंदी घालण्यात आलेल्या अनेक गटांची सोशल मीडिया अकाउंट असून त्यांनी शिया व अहमदी मुस्लिमांविरूद्ध गरळ ओकले होते.
ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानातील सिंध प्रांतात इन्स्टंट मेसेजिंग, व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकोल सेवा देणारे स्काइप, व्हायबर व इतर सेवांवर बंदी घालण्यात आली होती. दहशतवादी हल्ल्याची योजना आखण्यासाठी या सेवांचा वापर होतो, असे दिसून आले आहे. नंतर सिंधमधील बंदीची योजना पुढे जाऊ शकली नाही कारण संघराज्य सरकारने त्याला मंजुरी दिली नाही.