जामिया विद्यापीठात आणि जामिया नगर येथे नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाविरोधात १५ डिसेंवर रविवार रोजी, करण्यात आलेली तीव्र निदर्शनं व या दरम्यान उफाळलेल्या हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी दहा जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले सर्वजण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. मात्र, यामध्ये कोणत्याही विद्यार्थ्याचा समावेश नसल्याची देखील माहिती समोर आली आहे.

जामिया भागात झालेल्या हिंसाचारानंतर पसरत असलेल्या अफवा आणि केल्या जाणाऱ्या आरोपांवर दिल्ली पोलिसांना सोमवारी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले होते. दिल्ली पोलिसांच्यावतीने पीआरओ एम. एम. रंधावा यांनी माहिती देताना सांगितले होते की, या आंदोलनात जामियाच्या विद्यार्थ्यांबरोबरच परिसरातील स्थानिक लोकांचाही समावेश आहे. पोलिसांकडून एकही गोळी चालवण्यात आलेली नाही. तसेच कोणाचाही हिंसाचारात मृत्यू झालेला नाही, असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले होते. अफवांपासून सावध राहण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला होता.

यावेळी रंधावा यांनी सांगितले की, १३ डिसेंबरपासून हे निषेध आंदोलन सुरु आहे. १४ डिसेंबर रोजी देखील आंदोलन सुरुच होते त्यावेळी परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणाखाली होती. त्यानंतर रविवारी दुपारी २ ते ४ च्या दरम्यान आंदोलक माता मंदिर मार्ग भागापर्यंत पोहोचले. त्यानंतर बस पेटवण्यात आल्या. त्यानंतर पोलिसांनी जमावाला जामियानगर भागाकडे पसरवण्यात सुरुवात केली. दरम्यान, आंदोलकांनी पोलिसांवर बल्ब, ट्यूबलाइट आणि बाटल्या फेकल्या. रस्त्यातील एका हॉस्पिटलवरही दगडफेक करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, ४ डीटीसी बस, एका पोलिसांच्या बाईकसह १०० पेक्षा अधिक वाहने पेटवण्यात आली. यामध्ये बहुतेक बाईक आणि काही कार्सचा समावेश होता. यामध्ये काही पोलीस कर्मचारीही जखमी झाले होते.