एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी येथील न्यायालयाने मंगळवारी तिघांना दहा वर्षांचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तिघांनाही न्यायालयाने प्रत्येकी ५० हजार रुपये दंडही ठोठावला आहे. १५ जून २०१० रोजी वायव्य दिल्लीतील कारला गावात बलात्काराची ही घटना घडली होती.
कारला गावातील एक अल्पवयीन मुलगी बाजारातून जात असताना तेथीलच रहिवासी असलेल्या विजय या तरुणाने तिला जबरदस्तीने उचलून नेत एका बंद खोलीत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याचे मित्र विनयकुमार व अनिल या दोघांनीही तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. या प्रकाराची वाच्यता केल्यास परिणाम वाईट होतील अशी धमकी देऊन अल्पवयीन मुलीला या तिघांनीही सोडून दिले. या मुलीने घडलेला प्रकार आईजवळ कथित केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १६ जून २०१० रोजी संबंधित मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी विनय, विजय व अनिल या तिघांनाही अटक केली.
मंगळवारी या प्रकरणी दिल्ली न्यायालयाने निकाल देत तिघांनाही दहा वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावतानाच अल्पवयीन मुलीला नुकसानभरपाई म्हणून प्रत्येकी ५० हजार रुपये दंडही सुनावला.