चीनचे समुद्रातील धाडस वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर, भारतीय नौदलासाठी ६ पारंपरिक पाणबुडय़ा बांधण्याच्या ५५ हजार कोटी रुपयांच्या महाप्रकल्पासाठी पुढील महिन्यापर्यंत निविदा प्रक्रिया सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली आहे.

अत्याधुनिक लष्करी साधनसामुग्री देशातच तयार करून त्यांच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी विदेशातील बडय़ा संरक्षण साहित्य उत्पादक कंपन्यांसोबत भागीदारी करण्यास देशी कंपन्यांना परवानगी देणाऱ्या सामरिक भागीदारी प्रारूपांतर्गत या पाणबुडय़ांची निर्मिती केली जाणार आहे. ‘पी-७५’ असे नाव ठेवण्यात आलेल्या या महाप्रकल्पाकरिता, या पाणबुडय़ांच्या तपशिलासारखी प्राथमिक कामे आणि प्रस्तावाबाबतची विनंती जारी करण्यासाठीची औपचारिकता संरक्षण मंत्रालय आणि भारतीय नौदल यांच्या वेगवेगळ्या चमूंनी पूर्ण केली आहे. आरपीएफ ऑक्टोबपर्यंत जारी केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांपैकी एक असलेल्या या प्रकल्पासाठी संरक्षण मंत्रालयाने एल अँड टी समूह व माझगाव डॉक्स लि. या २ भारतीय शिपयार्ड व ५ विदेशी संरक्षण साहित्य कंपन्या यांची नावे विचारात घेतली आहेत.