उन्नाओ आणि कठुआ येथील बलात्कार प्रकरणांविषयीची माहिती समोर आल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. अवघ्या आठ वर्षांच्या मुलीवर मंदिरात बलात्कार करुन तिची हत्या करण्यात येते हे कृत्य माणुसकीला काळीमा फासणारं आहे, अशीच प्रतिक्रिया सर्व स्तरांतून देण्यात येत आहे. हे दुष्कृत्य करणाऱ्यांना अतिशय कठोर शिक्षा झालीच पाहिजे ही मागणीसुद्धा सर्व क्षेत्रांतून करण्यात येत असून, हे प्रकरण जास्तच जोर धरु लागल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरही सेलिब्रिटींनी या प्रकरणी ट्विट करत कठुआ बलात्कार पीडितेला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.

फरहान अख्तर, सोनम कपूर, रेणुका शहाणे, रितेश देशमुख, सानिया मिर्झा, गुल पनाग आणि अशा इतरही सेलिब्रिटींनी पुढे येत या प्रकरणी आवाज उठवला आहे.

‘जगभरात आपल्या देशाची ओळख अशाप्रकारे निर्माण व्हावी असं आपण इच्छितो का? आपला धर्म, लिंग, जात, वर्ण या गोष्टी बाजूला सारून जर आपण त्या आठ वर्षांच्या मुलीला न्याय मिळावा यासाठी आवाज उठवू शकत नाही, तर या जगात आपल्या अस्तित्वाचंही काहीच महत्त्व राहणार नाही, माणुसकीलाही नाही,’ असं लक्षवेधी ट्विट सानियाने केलं. याच ट्विटवर एका युजरने निशाणा साधत थेट सानियाच्या नागरिकत्वावरच प्रश्नचिन्हं उपस्थित केलं.

वाचा : बलात्कार करणाऱ्यांना जगण्याचा हक्क नाही; रेणुका शहाणे यांची जळजळीत पोस्ट

‘मी तुमचा आदर करतो. पण, माझ्या माहितीनुसार एका पाकिस्तानी व्यक्तीशी लग्न केल्यामुळे आता तुम्ही भारतीय नाही. त्यामुळे तुम्ही नेमकं कोणत्या देशाविषयी बोलताय?’, असं ट्विट किचू कानन नमो या स्वघोषित गीतकाराने केलं. त्याच्या या ट्विटला उत्तर देत सानियानेही लिहिलं, ‘पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कोणत्या ठिकाणाशी नाही तर एका व्यक्तीशी लग्न करता. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्यासारख्यांनी मी कोणत्या देशाची नागरिक आहे हे सांगण्याची वेळ अजून आलेली नाही. मी भारतासाठी खेळते. भारतीय आहे आणि भारतीयच राहीन. तुम्हीही जात, दर्म, देश यांच्यापलीकडे जाऊन विचार केला तर एक दिवस फक्त आणि फक्त माणुसकीच्या बाजूने उभे असाल.’ सानियाचं हे ट्विट पाहता तिने आपल्या नागरिकत्वाविषयी शंका असणाऱ्या सर्वांनाच थेट शब्दांमध्ये उत्तर दिलं आहे, असं म्हणायला हरकत नाही.