सीएसई संस्थेच्या अहवालातील माहिती
भारताची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये हवा प्रदूषणाची स्थिती वाईट असून दरवर्षी त्यामुळे १० ते ३० हजार लोकांचा मृत्यू होतो, असे सेंटर फॉर सायन्स अँड एनव्हायर्नमेंट (सीएसई) संस्थेच्या अहवालात म्हटले आहे. बॉडी बर्डन २०१५- स्टेट ऑफ इंडियाज हेल्थ या अहवालानुसार हवामान बदलामुळे टोकाच्या हवामान विषयक घटना घडत आहेत. पर्यावरण व आरोग्य यांचा संबंध स्पष्ट करणाऱ्या या अहवालात म्हटले आहे की, वाहने व औद्योगिक कारखाने तसेच इतर कारणांमुळे हवेचे प्रदूषण होत आहे. गेल्या दहा वर्षांत जगामध्ये हवा प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूत ३०० टक्के वाढ झाली आहे. ही संख्या २००० मध्ये ८ लाख होती ती २०१२ मध्ये ३२ लाख झाली. नवी दिल्ली हे जगातील सर्वात प्रदूषित शहर असून दरवर्षी १० ते ३० हजार मृत्यू होत आहेत. जगात मृत्यूची जी दहा महत्त्वाची कारणे आहेत त्यात हवा प्रदूषण हे महत्त्वाचे कारण आहे.
भारतात ते मृत्यूचे पाचव्या क्रमांकाचे कारण आहे. पक्षाघात, श्वासाचे रोग, हृदयरोग, ब्राँकायटिस, फुफ्फुसाचा कर्करोग यामुळे ६ लाख २० हजार लोक अकाली मरण पावतात. संस्थेच्या महासंचालक सुनीता नारायण यांनी सांगितले की, हवा प्रदूषणाचे स्रोत कमी करणे महत्त्वाचे आहे, त्यात वाहतुकीत सुधारणा आवश्यक आहे. भारतात हवामान बदल मोठय़ा प्रमाणात होत असून त्यामुळे मलेरिया व डेंग्यू या रोगांचे प्रमाण वाढले आहे.
राज्यांमधील आकडेवारीनुसार मलेरियाचा वर्षांतील कालावधी वाढला असून तो १०-१२ महिने म्हणजे संपूर्ण वर्षभरच झाला आहे. कोलकात्यात डेंग्यू पसरण्याचा कालावधी ४४ आठवडे आहे. ५२ आठवडे तापमानात २.४ अंश सेल्सियस वाढण्याचा कल आहे. त्यामुळे डेंग्यूचा धोका वाढतो. आंध्र प्रदेश व ओदिशात उष्णतेच्या लाटेने ६०० लोक मरण पावले आहेत. काही ठिकाणी स्थानिक पातळीवर तोडगा काढणे आवश्यक असते. उदाहरणार्थ अहमदाबादमध्ये उष्णतेच्या लाटेवेळी प्रसूति कक्ष वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर हलवण्यात आला होता. पर्यावरणात सुधारणा केल्यास रोगांवरचा उपचाराचा खर्च कमी होऊ शकतो. हवामान बदलांचा पिकावरही परिणाम झाला असून त्यामुळे पिकांची हानी झाली आहे. टोकाच्या हवामान घटनांची परिस्थिती वाढणार असून त्यामुळे शेतीची हानी वाढणार आहे. भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या महासंचालक सौम्या स्वामिनाथन यांनी हा अहवाल जाहीर केला.