अलिगढ मुस्लिम विद्यापीठात (एएमयू) देशविरोधी घोषणाबाजी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे १४ विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल विद्यापीठात गोंधळ निर्माण झाला होता, त्यानंतर इथली परिस्थिती बिघडतच चालल्याने इंटरनेट सेवाही खंडीत करण्यात आली आहे. त्याचबरोबर सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा य़ेथे तैनात करण्यात आल्याने संपूर्ण विद्यापीठ परिसराला छावणीचे स्वरुप आले आहे. तसेच विद्यापीठातील सर्व कार्यक्रम पुढील २४ तासांसाठी रद्द करण्यात आले आहेत. तर ५६ विद्यार्थ्यांविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले आहे.

अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेने मंगळवारी सामाजीक शास्त्र विभागाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी एमआयएमचे खासदार असदुद्दीन औवेसी यांना देखील निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी औवेसींच्या कार्यक्रमाला काही लोकांनी जोरदार विरोध दर्शवला. या विरोधानंतर विद्यार्थी नेता अजय सिंह याला दुसऱ्या गटाच्या विद्यार्थ्यांनी मारहाण केली. यानंतर इथली परिस्थिती आणखीनच चिघळली. वार्तांकनासाठी आलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींशीही यावेळी धक्काबुक्की करण्यात आली.

दरम्यान, विद्यापीठाच्या परिसरात काही विद्यार्थ्यांनी फिरुन कथीत स्वरुपात देशविरोधी घोषणाबाजी केल्याचे सांगण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर या विद्यार्थ्यांनी पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही केल्याचेही बोलले जात आहे. पोलिसांना विद्यार्थ्यांच्या या घोषणाबाजीचा एक व्हिडीओ देखील मिळाला आहे. त्यावरुन पोलिसांनी १४ जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.

अलिगढच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, विद्यापीठातील वातावरण बिघडवणाऱ्यांची ओळख पटली आहे. यांमध्ये ५६ असे विद्यार्थी आहेत ज्यांच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल झालेले आहेत. या विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यासाठी कोर्टाकडून अजामिनपात्र अटक वॉरंट काढण्यात आले आहे. त्याचबरोबर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून याला कारणीभूत असणाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे.