जम्मू सेक्टर परिसरातील भारत-पाक सीमेवरील १४ गावे पाकिस्तानचे सॉफ्ट टार्गेट ठरले असून सततच्या बाँबहल्ल्यांमुळे येथील नागरिकांना जगणेच असह्य़ झाले आहे. भारतीय लष्कराच्या मदतीने दिवस काढणाऱ्या या गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन झाले पाहिजे, असे वाटत असून त्यासाठी ते स्थानिक प्रशासनाऐवजी लष्करालाच गळ घालत आहेत.
या भागात गेल्या वर्षी स्वातंत्र दिन पाकिस्तानकडून प्रचंड बाँबहल्ले झाले. यात अनेकांनी आपले सगेसोयरे गमावले. याशिवाय, मोठी वित्त हानी झाली. भारताची नियंत्रण रेषा आणि घुसखोरांना रोखण्यासाठी उभारण्यात आलेले काटेरी कुंपण या दरम्यान धेरी, धाराती, सोहाला, भारुती, बालाकोट, डाब्बी, पंजानी, रामलुता, गालुता, सासुता, चाप्पर धरा, कांगा, डटोत, बसुनी फारवर्ड ही १४ गावे वसलेली आहेत. पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचा सर्वाधिक फटका यांना बसतो. सततच्या या कुरापतीना गावकरी कंटाळले आहेत. त्यांना शांततेने सुरक्षित जीवन जगावयाचे आहे. गेल्या वर्षी १५ ऑगस्टला पाकिस्तानकडून बाँबहल्ले झाले. त्यात बसुनी या गावाचे सरपंच करामतुल्ला खान ठार झाले होते. त्यांची मुलगी शमरेझ कौसर ही बारावीची विद्यार्थिनी आहे. सीमेवरील गावातील लोकांना पायाभूत सुविधा, सुरक्षा देण्यात स्थानिक प्रशासन अपयशी ठरल्याचे तिचे म्हणणे होते. ती म्हणाली, ‘तिचे वडील पाकडून झालेल्या बाँबहल्ल्यात मारले गेले. त्यानंतर अनेकांनी घरी भेट दिली. सांत्वन केले. त्यावेळी मदतीचे आश्वासन देण्यात आले होते, पण अद्याप ती हव्या त्या प्रमाणात मिळालेली नाही.’ स्थानिक प्रशासनावर रोष व्यक्त करतानाच पुढे उच्चशिक्षित होऊन लष्करात डॉक्टर होण्याचे स्वप्न असल्याचेही ती म्हणाली. सरपंच करामतुल्ला खान हे स्वातंत्र दिनी तिरंगा फडवण्यासाठी एका शाळेत गेले होते. झेंडावंदनाचा कार्यक्रम झाला. थोडय़ात वेळात पाकिस्तानकडून बाँबहल्ले झाले. सरपंच, शाळेतील एक शिक्षक आणि एक विद्यार्थी वाहनाने जात असताना त्यावर बॉम्ब पडले. त्यात ते तिघेही ठार झाले.
या दिवशी झालेल्या बाँबहल्ल्यात बालाकोट येथील मोहंमद अलिम खान यांची पत्नी नुरसत खानचा मृत्यू झाला. पाकिस्तानाने अशाप्रकारे सीमावर्ती भागातील लोकांना त्रास देणे थांबवले पाहिजे, असे ते म्हणाले. पाकिस्ताने असे करणार नाही. कारण, भारतीयांना ठार करणे हे त्यांचे एकमेव ध्येय आहे. बाँबहल्ले सुरू असताना सर्व गावकऱ्यांना घरात दडून राहावे लागते. सारेच कठीण होऊन जाते. विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहतात. प्रकृती बिघडल्यास वेळेवर औषधोपचार मिळत नाही. अनेकदा लष्कर मदतीला धावून देते. बऱ्याच कल्याणकारी उपक्रम राबवण्यात येतात, पण नियंत्रण रेषेपासून केवळे ७०० मीटरवर असलेल्या गावकऱ्यांना बाँबहल्ले सुरू असताना जीव मुठीत धरून बसण्याशिवाय पर्याय नसतो, असे भारुती येथील जावेद खान म्हणाले. नियंत्रण रेषा आणि काटेरी कुंपण यात हे गाव आहे. स्थानिक प्रशासन या भागात येण्यास घाबरते, असे लष्करातील एक वरिष्ठाधिकारी म्हणाले.

वृद्ध पित्याची व्यथा
भारताच्या स्वातंत्र्य दिनी झालेल्या बाँबहल्ल्यात माझा एक मुलगा ठार झाला आणि दुसरा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर दोन महिने उपचार करण्यात आले, पण तो जायबंदी आहे. तिसरा मुलगा लहान आहे. मी ५० वर्षांचा आहे. स्थानिक प्रशासनाने आर्थिक मदत आणि एका मुलास नोकरी देण्यात येईल, असे म्हटले होते. ५ लाख रुपये मिळणार, असे सांगत आले, पण केवळ १ लाख रुपये मिळाले. एक मुलगा १८ वर्षांचा आहे. तो सहावीपर्यंत शिकला. त्याच्यालायक जी कोणती नोकरी असेल ती देण्यात यावी. सीमेवरील गावकऱ्यांना बँकर बांधून देण्यात यावे किंवा कुंपणापलिकडे भूखंड दिले जावे. सीमा भागात शेती आहे. ती सोडण्यास तयार आहोत, असे सासुता येथील मोहंमद अजीत म्हणाले.