राष्ट्रीय जनता दल पक्षाचे (राजद) प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी बिहारचे मुख्यमंत्री आणि राजकीय विरोधक असणाऱ्या नितीश कुमार यांच्यावर फिल्मी स्टाइलने टीका केली आहे. संघमुक्त भारताची शपथ घेणाऱ्या कुमार यांनी भाजपाशी हात मिळवणी करण्यावरुन लालू यांनी कुमार यांना टोला लगावला आहे.

भाजपाचे संस्थापक सदस्य असणाऱ्या दीन दयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त पाटण्यामध्ये त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमारही उपस्थित होते. याच कार्यक्रमाचे फोटो चारा घोटाळाप्रकरणी रांची येथील तुरुंगामध्ये शिक्षा भोगत असणाऱ्या लालू यांच्या ट्विटर हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आले. लालूंच्या जवळच्या सहकाऱ्यांकडून चालवल्या जाणाऱ्या या ट्विटर हॅण्डलवरुन या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या नितीश कुमार यांना फिल्मी टोला लगावण्यात आला.

उपाध्याय यांच्या पुतळ्यासमोर हात जोडून उभ्या असणाऱ्या नितीश यांचा फोटो आणि कार्यक्रमाची आमंत्रण पत्रिका ट्विट केली आहे. या फोटोंना कॅप्शन देताना थेट १९९० च्या दशकातील महेश भट्ट यांच्या ‘फिर तेरी कहाणी याद आयी’ या चित्रपटातील गाण्याच्या ओळी लिहिल्या आहेत. “तेरे दर पर सनम चले आये… तू ना आया तो हम चले आये,” या गाण्याच्या आठ ओळी कॅप्शन म्हणून पोस्ट केल्या आहेत. “हे प्रिये तू आली नाहीस म्हणून मीच तुझ्या दाराशी आलो आहे. तू नव्हतीस तर मला काही अपेक्षाच नव्हत्या माझी तहानही मेली होती,” असा या ओळीचा अर्थ होतो. याच गाण्यामध्ये थोडा बदल करत, “ले के संघमुक्त भारत का भरम चले आये… ले के अपना भरम स्वयं चले आये… तेरे दर पर सनम चले आये.. तू ना आया तो हम चले आये” असा टोला लालू यांनी नितीश यांना लगावला आहे.

राजदबरोबरची युती तोडत जदयूने बिहारमध्ये भाजपाबरोबर सत्ता स्थापन केली. त्यानंतर या दोन्ही पक्षांमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत.