सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने १९९५ साली हिंदुत्वाच्या व्याख्येबाबत दिलेल्या निकालाचा हवाला देत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गुरुवारी त्यांच्यावर होणारा कट्टरतावादाचा आरोप परतवून लावला़  तसेच ‘हिंदू दहशतवाद’ ही संकल्पनाच मुळी संघाची प्रतिमा मलिन करण्यासाठी एका विशिष्ट गटाकडून तयार करण्यात आली आहे, असा आरोपही संघाचे प्रवक्ते राम माधव यांनी केला आह़े
२००८ सालापासून दहशतवादाशी संबंधित गुन्ह्यांचे पाच खटल्यांत हिंदू समाजाच्या आरोपींना अटक करण्यात आली आह़े परंतु, यापैकी कोणत्याही खटल्यात अद्याप आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही़  तसेच अटक करण्यात आलेल्या व्यक्तींपैकी कोणालाही अद्याप जामीन मिळालेला नाही, असेही राम माधव म्हणाल़े  देशात ऐक्य नांदविण्याचे उद्दिष्ट ठेवूनच संघ काम करीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केल़े
माजी सरन्यायाधीश गजेंद्रगडकर यांनी १९९६ मध्ये आणि न्या़ ज़े एस़ वर्मा यांनी १९९५ मध्ये दिलेल्या सविस्तर निकालामध्ये हिंदुत्व ही जीवनशैली असल्याचे म्हटले आह़े  येत्या मार्चमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायमूर्तीच्या खंडपीठापुढे हे प्रकरण पुन्हा सुनावणीसाठी येणार आहे, अशी माहिती या वेळी माधव यांनी दिली़