गुजरातमध्ये दहा दहशतवादी घुसल्याचा इशारा पाकिस्तानकडून देण्यात  आला आहे. उद्या महाशिवरात्री दिनी दहशतवादी हल्ला घडविण्याचा त्यांच्या उद्देश असल्याचे कळते. सदर माहितीनंतर राज्यामधील सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली असून या दहशतवाद्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे. पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नासीर खान जनुजा यांनी भारतीय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल यांना हा इशारा दिला आहे.
महाशिवरात्रीस मोठा दहशतवादी हल्ला घडविण्याची या दहशतवाद्यांची योजना असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. हे दहशतवादी लष्करे तैयबा आणि जैश-ए-मुहम्मद या संघटनांचे ‘फिदायीन’ आहेत. पाकिस्तानकडून अशा स्वरुपाची माहिती प्रथमच देण्यात आली आहे. दरम्यान, दहशतवादी घुसल्यामुळे सोमनाथ मंदिरात महाशिवरात्रीच्या निमित्ताने होणारे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
ही माहिती मिळाल्यानंतर गुजरातमध्ये अतिदक्षतेचा इशारा जारी करण्यात आला. गुजरातमधील सर्व सुरक्षा यंत्रणा सर्तक झाल्या असून, संवेदनशील आणि संभाव्य धोका असलेल्या ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा पथके तैनात करण्यात आली आहेत. राज्याचे पोलिस महासंचालक पी.सी.ठाकूर यांनी तातडीची बैठकही घेतली.