जैश ए महम्मदच्या अतिरेक्याने गुरुवारी पुलवामा जिल्ह्य़ात केलेल्या भ्याड हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ३९ जवान शहीद झाले. जवानावर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा जगभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. अमेरिका, फ्रान्स आणि रशियाकडून या हल्ल्याबद्दल चिंता व्यक्त केली असून निषेध व्यक्त केला आहे.

पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याची निंदा केली आहे. जगभरातील सर्व देशांना दहशतवाद्यांना सुरक्षित जागा आणि समर्थन न देण्याची विनंती अमेरिकाने केली आहे. दहशतवादाविरोधातील लढाईत आम्ही तुमच्या सोबत असल्याचे आश्वासन अमेरिकेच्या विदेश मंत्रलयाने भारताला दिले आहे. अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाने भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियाबद्दल संवेदना व्यक्त केली आहे.

रशियाने या दहशतवादी हल्ल्याचा निंदा केली आहे. अशा अमानवीय कृत्यांचा सामना करण्याची गरज असल्याचे प्रतिक्रिया रशियाने दिली आहे. भारतमधील फ्रान्सचे राजदूत अलेक्जेंड्रे जिगलर म्हणाले की, ‘पुलवामामध्ये जवानावर झालेल्या अमानुष्य हल्ल्याचा फ्रान्स निंदा करत आहे. दहशतवादाविरोधातील लढाईल फ्रान्स नेहमीच भारतासोबत उभा असेल.’

ऑस्ट्रेलिया, तुर्की, चेक गणराज्य या देशांनीही या भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. भारताच्या शेजारी असलेले बांग्लादेश, भूटान, श्रीलंका आणि मालदीव यांनी दहशतवादाविरोधात एकत्र येऊन लढण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. संयुक्त राष्ट्र महासचिव एंटोनियो गुटरेस यांनीही या हल्ल्याचा तिव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. या हल्ल्याच्या मागे असणाऱ्याविरोधात कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे.

गुरूवारी रात्री उशीरा पाकिस्तान सरकारकडून निवेदनाद्वारे पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला. तसंच, पुलवामा हल्ला म्हणजे गंभीर चिंतेचा विषय असल्याचं पाकिस्तानने निवेदनात म्हटलं. याशिवाय जगात कोठेही हिंसा झाली तरी पाकिस्तान त्याचा निषेधच करतो असंही नमूद करण्यात आलं आहे. भारतीय मीडिया आणि भारत सरकारमधील काही तत्व कोणत्याही तपासाशिवाय या हल्ल्याचा संबंध पाकिस्तानशी जोडण्याचा प्रयत्न करत असल्याचंही पाकिस्तानने म्हटलं आहे.

तब्बल ३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे जैश ए महम्मदच्या अतिरेक्याने गुरुवारी पुलवामा जिल्ह्य़ात चढविलेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ३९ जवान शहीद झाले असून अनेकजण जखमी झाले आहेत. गेल्या दोन दशकांतील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. या हल्ल्याने देशभर संतापाची लाट उसळली आहे.