‘टेरर फेडिंग’ प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला काश्मीरमधील फुटिरतावादी नेता शब्बीर शाह याचा जामीन अर्ज आज दिल्लीतील स्थानिक न्यायालयाने फेटाळून लावला. ९ ऑगस्ट रोजी न्यायालयाने शाहला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.


आर्थिक गैरव्यवहार आणि दहशतवादी कारवायांसाठी पैसा पुरवल्याप्रकरणी शाहला २५ जुलै रोजी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) श्रीनगर येथून अटक केली होती. त्यानंतर त्याला दिल्ली येथे आणण्यात आले होते. त्यानंतर त्याला इथल्याच न्यायालयात हजर करण्यात आले होते.

शाह देशविघातक कारवायांसाठी पैसा पुरवत असल्याचे ईडीने न्यायालयात सांगितले होते, त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला न्यायालयाने शाहच्या ईडी कोठडीला परवानगी दिली होती. त्यानंतर ईडीने शाहला अनेकदा समन्स बजावले. मात्र, त्याने या समन्सला कधीही उत्तर दिले नाही. न्यायालयाने जुलैमध्ये शाहच्या नावे अजामीनपात्र अटक वॉरंटही काढले होते.

ईडीने शाहला २००५ मधील हवाला प्रकरणी समन्स बजावले होते. याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने त्यावेळी मोहम्मद अस्लम वानी (३५) याला ताब्यात घेतले होते. पोलिसांच्या चौकशीत वानीने आपण शाहला २.२५ कोटी रुपये दिल्याचे मान्य केले होते. त्यानंतर ईडीने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधीत कायद्यांतर्गत शाह आणि वानी या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

२६ ऑगस्ट २००५ रोजी वानीला अटक केली तेव्हा त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर दारुगोळा आणि ६३ लाख रुपये जप्त करण्यात आले होते. त्याने हे पैसे हवालामार्फत मध्य-पूर्व आशियातील देशांमधून मिळवले होते.