सीमेपलिकडून आणि पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांकडून होणाऱ्या आर्थिक मदत (टेरर फंडिंग) प्रकरणात अनेक फुटीरतावादी नेत्यांची चौकशी सुरू असतानाच राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (एनआयए) कारवाईचा फास आणखी आवळला आहे. एनआयएनं आज जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर, बारामुल्ला आणि हंदवाड्यातील १२ ठिकाणी छापे मारले. याच प्रकरणात गेल्या महिन्यात यंत्रणेनं फुटीरतावादी नेता शाहीद उल इस्लामची चौकशी केली होती. त्यावेळी त्याच्याकडे जवळपास दीडशे दहशतवाद्यांच्या नावांची यादी मिळाली होती.

 

टेरर फंडिंगप्रकरणी एनआयएचे छापेमारीसत्र सुरूच आहे. श्रीनगरमधील पीरबाग आणि आलूचीबाग या दोन ठिकाणांवर छापे मारले आहेत. त्यात व्यावसायिकांचा समावेश आहे. व्यावसायिक जहूर वटाली याच्या चालकाच्या घरावरही छापे मारले आहेत. वटालीच्या जवळच्या व्यक्तींच्या घरांवरही कारवाई केली आहे. त्याची दुबई, मुंबई, दिल्ली आणि चंदीगडमध्ये संपत्ती आहे. मोहम्मद अकबर या त्याच्या चालकाच्या घरावरही छापे मारले. एनआयएकडून काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून होणाऱ्या आर्थिक मदत प्रकरणाची चौकशी सुरू आहे. जहूर वटाली हा मुख्य सूत्रधार असल्याचं सांगण्यात येत आहे. खोऱ्यात अशांतता माजवणाऱ्यांच्या कथित वित्तपुरवठादारांच्या यादीत जहूर अग्रस्थानी असल्याची माहिती समोर आली होती. त्याचे फुटीरतावादी नेत्यांशी चांगले संबंध आहेत. टेरर फंडिंग प्रकरणात आतापर्यंत अनेक फुटीरतावादी नेत्यांना अटक करण्यात आली आहे. यंत्रणेनं जवळपास २० दिवस त्यांची चौकशी केली. ती अद्याप सुरुच आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अल्ताफ फंटूश, मेहराजुद्दीन कलवाल, पीर सैफुल्लाह आणि नईम खान यांना न्यायालयानं २८ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे. ते सध्या तिहार तुरुंगात आहेत. यातील फंटूश हा फुटीरतावादी नेता गिलानी याचा जावई आहे. टेरर फंडिंग प्रकरणात एकूण सात फुटीरतावादी नेत्यांना अटक करण्यात आली होती.