पंतप्रधान मनमोहन सिंग आणि यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मंगळवारपासून सुरू होणाऱ्या काश्मीर दौऱ्याच्या एक दिवस आधी दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात आठ जवान शहीद झाले, तर १९ जण गंभीर जखमी झाले. काश्मीरमध्ये गेल्या तीन दिवसांतील हा दुसरा मोठा दहशतवादी हल्ला आहे. दरम्यान, दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर पंतप्रधानांचा नियोजित दौरा रद्द करण्यात येणार नसल्याचे पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केले. या हल्ल्याची जबाबदारी हिजबूल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेने स्वीकारली असून आणखी असेच हल्ले करण्याचा इशाराही दिला आहे.
श्रीनगरमधील विमानतळ-लाल चौक मार्गावरील हायदरपुरा बायपासवरून सोमवारी लष्कराचा ताफा जात असताना रस्त्याच्या बाजूला दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी अचानक अंदाधुंद गोळीबार केला आणि त्यानंतर पलायन केले. या गोळीबारात आठ जवान शहीद झाले, तर १९ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली. या हल्ल्यानंतर लष्कर, पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाने संयुक्तपणे दहशतवाद्यांना शोधण्यासाठी नाकेबंदी करून शोधमोहीम सुरू केली. दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी हिजबुल मुजाहिदीनने स्वीकारली आहे.

पंतप्रधानांचा दौरा होणार
दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंगळवारपासून सुरू होणाऱ्या पूर्वनियोजित दौऱ्यात कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आला नसल्याचे पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केले.