अनेक दहशतवादी कारवायांचा कट पाकिस्तानातूनच केला जातो, हे आता लपून राहिलेले नाही. मात्र आम्ही कायम दहशतवाद्यांच्या विरोधात असतो, असा कांगावा पाकिस्तानकडून केला जातो. आताही दहशतवादविरोधी भूमिका घेऊन पाकिस्तानच्या नवाज शरीफ सरकारने त्यांच्याशी आमचा संबंध नसल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ‘‘दहशतवाद हा एखाद्या रोगासारखा आहे. समाजासाठी हा रोग अधिक धोकादायक असल्याने पाकिस्तान सरकार त्याचे उच्चाटन करणार आहे,’’ असे शरीफ यांनी गुरुवारी सांगितले.
‘द बिल अँउ मेलिंडा गेट्स फाऊंडेशन’च्या ख्रिस एलिअस यांनी घेतलेल्या मुलाखतीत शरीफ यांनी आपली भूमिका मांडली.
 दहशतवाद नावाच्या या विकारावर जर उपचार केला तर, आपली  इतर विकारांपासूनही सुटका होऊ शकते, असे शरीफ म्हणाले. पोलिओ हा विकार देशातून हद्दपार करण्याचा विडा पाकिस्तान सरकारने उचलला असून, या फाऊंडेशनचा त्यांना या कामी खूपच फायदा झाला, असे शरीफ यांनी सांगितले.  
जगातील केवळ तीन देशांमध्ये अद्याप पोलिओचे पूर्णपणे उच्चाटन झालेले नाही. पाकिस्तानही या तीन देशांपैकी एक आहे. पाकिस्तानमधील दुर्गम भागांमध्ये अजूनही पोलिओचे रुग्ण आढळतात. तालिबानी आणि दहशतवादी संघटनांनी हल्ल्याची धमकी दिल्यामुळे या भागांमध्ये पोलिओविरोधी कार्यक्रम राबवण्यात अडचणी येत आहेत.