श्रीनगर :  यूपीए सरकारच्या काळापेक्षा आमच्या राजवटीत काश्मीरमध्ये सर्वाधिक दहशतवादी मारले गेले, या एनडीएच्या दाव्यावरून उलट दहशतवादात वाढ  झाल्याचे स्पष्ट झाले व एनडीएनेच दहशतवाद पोसला व हिंसाचार वाढू दिला असा त्याचा अर्थ होतो,असा आरोप नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी केला आहे.

केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी असा दावा केला होता, की आमच्या राजवटीत यूपीएच्या काळापेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले; त्यावर प्रतिक्रिया देताना ओमर यांनी ट्विटरवर म्हटले आहे, की प्रत्यक्षात मंत्रीसाहेब त्यांच्या सरकारने दहशतवाद व हिंसाचार कसा वाढू दिला याची कबुलीच यातून देत आहेत.

रवीशंकर प्रसाद यांनी असे म्हटले होते, की यूपीएच्या काळात २०१२ व २०१३ मध्ये अनुक्रमे ७२ व ६७ दहशतवादी मारले गेले होते, २०१४ मध्ये भाजप सरकार सत्तेवर येताच ११० दहशतवादी मारले गेले. सुरक्षा दलांनी २०१५ मध्ये १०८, २०१६ मध्ये १५० तर २०१७ मध्ये २१७ दहशतवादी मारले तर या वर्षी मेपर्यंत ७५ दहशतवादी मारले गेले आहेत.

ओमर यांनी सांगितले ,की मंत्र्यांच्या वक्तव्यातून सरकारची कामगिरी दिसत नाही, तर दहशतवाद वाढल्याचे दिसते. किती दहशतवादी मारले याची माहिती देण्याच्या नादात तेच अडकले आहेत.