पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी जागतिक स्तरावर विविध राष्ट्रप्रमुखांशी दुरध्वनीवरुन चर्चा केली. तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रिसेप तय्यीप एर्दोगान यांच्याशी चर्चा करताना मोदींनी दहशतवाद हा जागतिक शांततेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी विविध राष्ट्रप्रमुखांशी फोनवरुन चर्चा केली. तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांनी मोदींशी चर्चा करताना पुलवामा हल्ल्याबाबत शोक व्यक्त केला. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना केली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक दहशतवादाबाबत भाष्य केले. दहशतवादाविरोधात सर्व देशांनी कठोर भूमिका घेण्याचे गरज असल्याचे त्यांनी सांगितले.  दहशतवाद हा जागतिक शांततेच्या आणि सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे त्यांनी नमूद केले.

तुर्कस्तानसोबतच मोदींनी यूएईचे राजे शेख मोहम्मद बिन झायेद यांच्याशी देखील चर्चा केली. मोदींनी दोन्ही देशांमधील द्विपक्षीय सुधारत असल्याबाबत समाधान व्यक्त केले.

दरम्यान, भारत व पाकिस्तान यांच्यात पुलवामा हल्ल्यानंतरच्या घटनाक्रमानंतर तणाव असताना परराष्ट्र सचिव विजय गोखले हे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन परराष्ट्र धोरण व सुरक्षा विषयक प्रश्नांवर चर्चा करणार आहेत. गोखले यांचे रविवारी अमेरिकेत आगमन झाले असून ते तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. द्विपक्षीय परराष्ट्र सल्लामसलत व धोरणात्मक सुरक्षा संवादात चर्चा करण्यासाठी ते अमेरिकेत पोहोचले आहेत.