लष्कराच्या नगरोटा येथील कोअरचे प्रमुख ले. जनरल परमजित सिंग यांचा इशारा

पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे जाळे कायम असून, सुमारे १६० दहशतवादी भारतात घुसखोरी करण्यासाठी नियंत्रण रेषेपलीकडे वाट पाहात आहेत, असे भारतीय लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रविवारी सांगितले.

पाकिस्तानने त्याची धोरणे आणि इरादे यांत बदल केला, तरच सीमेपलीकडून होणारा दहशतवाद थांबेल, असे लेफ्टनंट जनरल परमजित सिंग यांनी ‘१६ कोअर’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या नगरोटा येथील व्हाईट नाइट कोअरचा पदभार स्वीकारल्यानंतर सांगितले.

ले.ज. परमजिंत सिंग हे २०१६ साली पाकव्याप्त काश्मीरमध्ये करण्यात आलेल्या लक्ष्यवेधी हल्ल्याच्या नियोजनात सहभागी होते. या घुसखोरीला आळा घालण्यासाठी लष्कर सज्ज असून, या घुसखोरांना हाताळण्यासाठी आमचे घुसखोरीविरोधी दल पुरेसे मजबूत आहे, असे ते म्हणाले.

पाकिस्तानातील निरनिराळ्या ठिकाणांवरून १४० ते १६० घुसखोरांना काश्मीरमध्ये घुसवण्याचा प्रयत्न होत आहे, असे जम्मू- काश्मीरच्या तिन्ही भागांमध्ये काम केलेले ले.ज. सिंग यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

दहशतवाद्यांचे जाळे तसेच असून, पाकिस्तानचे इरादे बदललेले नाहीत. पाकिस्तानी लष्कर व आयएसआय यांचा घुसखोरीची व दहशतवादी हल्ल्यांची योजना आखण्यातील सहभाग उघड असून तो कायमच आहे, असे उंचावरील भागातील युद्धाचा (हाय अल्टिटय़ूड वॉरफेअर) व्यापक अनुभव असलेले सिंग म्हणाले. डीजीएमओ स्तरावरील चर्चेनंतर सीमेवरील शस्त्रसंधी उल्लंघनाचे प्रकार कमी झाले आहेत, असे नियंत्रण रेषेवरील परिस्थितीबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सिंग यांनी सांगितले.