लष्कर प्रमुख सेनानायके यांची माहिती

श्रीलंकेत इस्टर रविवारी (२१ एप्रिल) चर्च व आलिशान हॉटेल्समध्ये आत्मघाती हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांनी काश्मीर, केरळमधील काही ठिकाणी भेट दिली होती तसेच त्यांना तेथे प्रशिक्षण मिळाले होते असे लष्कर प्रमुख महेश सेनानायके यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. श्रीलंकेत हल्ले होण्याची शक्यता गुप्तचर माहितीच्या आधारे त्या देशाला कळवली होती. या हल्ल्यात २५३ ठार तर इतर ५०० जण जखमी झाले होते. दहशतवाद्यांनी भारताला भेट दिली असल्याच्या वृत्तास श्रीलंकेच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी दुजोरा देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

श्रीलंकेत हल्ले करणाऱ्या  दहशतवाद्यांच्या हालचाली व त्यांचे आंतरराष्ट्रीय दुवे याबाबत लष्कर प्रमुख सेनानायके यांनी प्रथमच माहिती दिली असून त्यांनी बीबीसीला सांगितले की, संशयित हल्लेखोर हे भारतात गेले होते. काश्मीर, बंगळुरू, केरळ येथे त्यांनी भेटी दिल्या होत्या अशी माहिती मिळाली आहे.

काश्मीर व केरळात ते काय करीत होते असे विचारले असता ते म्हणाले की, आम्हाला त्याबाबत ठोस काही सांगता येणार नाही पण तेथे त्यांना काही प्रशिक्षण मिळाले असावे. त्यांचे भारतातील दहशतवादी संघटनांशी काही लागेबांधे असू शकतात.

भारताने या हल्ल्यांबाबत आधीच पूर्वसूचना देऊनही त्यावर गांभीर्याने कारवाई का झाली नाही असे विचारले असता ते म्हणाले की, आमच्याकडे काही माहिती होती. गुप्तचरांची माहिती मिळाली पण माहितीची देवाणघेवाण, प्रत्यक्ष परिस्थिती व लष्करी गुप्तचर यंत्रणा यात वेगवेगळ्या दिशेने सगळे चालले होते त्यात समन्वयाचा अभाव होता. राजकीय नेत्यांसह राष्ट्रीय सुरक्षा व गुप्तचर यंत्रणा यांच्यावर याचा ठपका जातो.

श्रीलंकेला लक्ष्य का केले गेले या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, येथे टोकाचे स्वातंत्र्य  व गेल्या दहा वर्षांत खूप शांतता होती. त्यामुळे लोक तीस वर्षांपूर्वी हाच देश कुठल्या परिस्थितीतून गेला आहे हे विसरून गेले. ३० वर्षे एलटीटीईचा दहशतवाद चालू होता त्यात १ लाख बळी गेले पण अखेर २००९ मध्ये या दहशतवादाचा पूर्ण बिमोड झाला व प्रभाकरन मारला गेला होता. नंतरही आता पुढे काही धोके नाहीत असे सगळेच जण समजून चालले होते.