25 February 2021

News Flash

दहशतवाद पोसणाऱ्यांना एकाकी पाडा!

अमेरिकन काँग्रेसमधील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाकिस्तानकडे सूचक बोट

अमेरिकन काँग्रेससमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी भाषण केले.

अमेरिकन काँग्रेसमधील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाकिस्तानकडे सूचक बोट
दहशतवाद हीच जगासमोरची सर्वात मोठी समस्या आहे. या दहशतवादाला आमच्या शेजाऱ्यांनी खतपाणी घातले असले तरी आज त्याची सावली जगभर पसरत आहे. कोणताही भेदाभेद न करता , दहशतवाद पोसणाऱ्यांना एकाकी पाडले पाहिजे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी अमेरिकन काँग्रेससमोरील भाषणात केले.
अमेरिकेच्या तीन दिवसांच्या दौऱ्यात अमेरिकन प्रतिनिधी गृहाच्या खास संयुक्त अधिवेशनात मोदी यांचे पाऊण तास भाषण झाले. भाषणादरम्यान सदस्यांनी मोदी यांच्या वाक्यांवर अनेकदा टाळ्या वाजवल्या तसेच अनेकदा हास्याची लकेरही उमटत होती.
मोदी म्हणाले की, जगात हा दहशतवाद विविध रूपे घेऊन वावरत असला तरी द्वेष, हत्या आणि हिंसा हीच त्याची समान तत्त्वे आहेत. जे राजकीय लाभासाठी दहशवादाचा प्रचार आणि प्रसार करीत आहेत त्यांना अमेरिकन काँग्रेसने नेहमीच स्पष्ट इशारा दिला आहे, ही आनंदाची बाब आहे.
समर्थ भारत हा अमेरिकेच्याच धोरणात्मक हिताचा आहे, असे सांगून वाजपेयी यांनी भारत आणि अमेरिका यांना स्वाभाविक भागीदार म्हटले होते, याचीही त्यांनी आठवण करून दिली.
अन्य कोणत्याही देशापेक्षा आमचा अमेरिकेशी व्यापार आहे. आपल्या वैज्ञानिक आणि तांत्रिक सहकार्याने सार्वजनिक आरोग्य, शिक्षण आणि कृषी क्षेत्रातील अनेक समस्या दूर होतील, असे त्यांनी सांगितले. मुंबईत २००८मध्ये दहशतवादी हल्ला झाला तेव्हा अमेरिकेने भारताची केलेली भक्कम पाठराखण मी विसरू शकत नाही, असेही ते म्हणाले.
वसुधैव कुटुम्बकम ही आमची प्राचीन धारणा असल्याने जागतिक शांती आणि विकासासाठी आम्ही नेहमीच आग्रही आहोत, असे ते म्हणाले. आमच्या पूर्वजांनी स्वातंत्र्य, लोकशाही आणि समतेची बिजे रुजवून भारत घडविला आहे. भारत एकदिलाने नांदत आहे, एकदिलाने विकास साधत आहे आणि एकदिलाने आनंद साजरा करीत आहे, असे चित्रही मोदी यांनी रंगविले.
भारतीय जनता राजकीयदृष्टय़ा आधीच प्रगत आहे. आता स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांपर्यंत म्हणजे २०२२पर्यंत मी त्यांना आर्थिकदृष्टय़ा समर्थ बनवू इच्छितो, असा संकल्पही त्यांनी बोलून दाखविला.
अमेरिकेतल्या अनिवासी भारतीयांचे त्यांनी भरभरून कौतुक केले. अमेरिकेत आज सर्वोत्तम कार्यकारी अध्यक्ष, डॉक्टर, अर्थतज्ज्ञ, शास्त्रज्ञ आणि इतकेच नव्हे तर स्पेलिंग बी चॅम्पियनही अनिवासी भारतीयच आहेत, असे ते म्हणाले.
अमेरिकेत योगाभ्यास करणारे तीन कोटी लोक आहेत आणि तरीही तुम्ही योगावर बौद्धिक संपदेचा हक्क सांगितलेला नाही, असे मोदी यांनी म्हणताच सभागृहात हास्याची लकेर उमटली.
वाद्यमेळाने आपल्या वाद्यांच्या तारा योग्य जुळवल्या आहेत, स्वरसंयोजकाची समन्वय साधणारी छडी हवेत उंचावली गेली आहे आणि नवी सिम्फनी छेडली जात आहे, या शब्दांत त्यांनी भाषणाचा समारोप केला.

अमेरिका स्तुती..
* अमेरिका हे लोकशाहीचे मंदिर असून त्याने जगभरातील अन्य लोकशाही देशांना प्रोत्साहन आणि बळ दिले आहे.
* अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांचा, सर्व लोक समान आहेत, हा मंत्र अमेरिकेच्या धमन्यांतून वाहात आहे. अमेरिका ही स्वातंत्र्याची आणि शौर्याची भूमी आहे.
* मी अमेरिकेचे २५ प्रांत फिरलो. त्यातून मला जाणवले की देशाचे खरे सामथ्र्य देशवासियांच्या स्वप्नांत असते.
* अमेरिकेच्या राज्यघटनेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरही अमीट प्रभाव पडला होता. शिकागो येथे स्वामी विवेकानंद यांनी केलेल्या भाषणाचाही मोदी यांनी उल्लेख केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2016 2:22 am

Web Title: terrorism is incubated in indias neighbourhood must be delegitimize pm modi to us congress
टॅग : Narendra Modi
Next Stories
1 काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल
2 योग दिनाच्या कार्यक्रमात ओंकाराची सक्ती नाही
3 पठाणकोट हल्ल्यातील दहशतवाद्यांनाही पाकिस्तानने तातडीने शिक्षा करावी
Just Now!
X