दहशतवाद हा मानवतेचा शत्रू असून संपूर्ण जगाला दहशतवादाचा फटका बसला आहे. या दहशतवादाचा  खात्मा करण्याची गरज असून दहशतवादाला मदत करणा-यांचीही गय केली जाणार नाही असा इशाराच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.  जटायूने सर्वात आधी दहशतवादाविरोधात लढा दिला होता असेही त्यांनी सांगितले आहे.

लखनऊमध्ये रावणदहनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. दहशतवादरुपी रावणाचे या कार्यक्रमात दहन केले जाणार होते. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतावादावरुन पाकिस्तानवर अप्रत्यक्षपणे टीका केली. दहशतवादाला पाठबळ देणा-यांनाही सोडायला नको असे  मोदी म्हणालेत. १९९२- ९३ मध्ये अमेरिकेतील अधिका-यांशी चर्चा करायचो. तेव्हा ती लोक म्हणायची की दहशतवाद हा तुमचा अंतर्गत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. पण ९/११ च्या हल्ल्यानंतर अमेरिकेचा दृष्टीकोन बदलला. जी लोक समजतात ते दहशतवातापासून मुक्त आहेत, तर त्यांचा समज चुकीचा आहे, दहशतवाद ही जागतिक समस्या असून तो समाजाला लागलेला व्हायरस आहे असे नरेंद्र मोदी म्हणालेत. जगातील सर्व शक्तींनी एकत्र येऊन दहशतवादाविरोधात लढा दिला पाहिजे असे त्यांनी सांगितले. भारत ही युद्धाची नव्हे बुद्धाची भूमी आहे, आम्ही बुद्धांच्या मार्गावर चालतो असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

दहशतवादासोबतच अस्वच्छता, गरिबी, भ्रष्टाचार आणि निरक्षरता हेदेखील आपल्या समाजातील रावणाची रुप आहेत. आपण त्यांचाही नायनाट केला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. आज आपण दसरा साजरा करतो. तर जगभरात आज जागतिक कन्या दिवस साजरा केला जात आहे. स्त्री आणि पुरुष भेदभाव हे रावणरुपी मानसिकतेचे दर्शन घडवते. स्त्रीया कोणत्याही समाजातील किंवा धर्माच्या असो, त्यांचा आदर केला पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे.