भारत आणि श्रीलंकेला दहशतवादाचा सारखाच धोका असून त्याच्याविरोधात एकत्रितरीत्या कृती केली पाहिजे, या मुद्दय़ावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाल सिरिसेना यांचे रविवारी एकमत झाले.

पंतप्रधान मोदी यांनी श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाल सिरिसेना यांची रविवारी भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. ईस्टरच्या बॉम्बहल्ल्यानंतर श्रीलंकेला भेट देणारे मोदी हे पहिले परदेशी नेते आहेत. एप्रिलमधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत श्रीलंकेच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे संकेत या भेटीतून देण्यात आले.

‘‘मी श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाल सिरिसेना यांची भेट घेतली. दोन्ही देशांना दहशतवादाचा सारखाच धोका आहे आणि तो नष्ट  करण्यासाठी एकत्रित कृतीची गरज असल्यावर आमचे एकमत झाले. सुरक्षित आणि समृद्ध भविष्यासाठी आपण श्रीलंकेशी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला,’’ असे ट्वीट भेटीनंतर मोदी यांनी केले. मोदी यांचे अध्यक्षीय प्रासादात शाही स्वागत करण्यात आले. पाऊस पडत असल्याने सिरिसेना यांनी स्वत: मोदी यांच्या डोक्यावर छत्री धरली होती.

पंतप्रधान मोदी यांनी ‘शेजारधर्माला प्राधान्य’ या धोरणानुसार मालदीवला आधी भेट दिली, नंतर ते श्रीलंकेला आले. दोन्ही देशातील संबंध दृढ असून त्याची पाळेमुळे खोलवर आहेत, असे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले.

समाधीस्थ बुद्धाची मूर्ती भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाल सिरिसेना यांनी समाधीस्थ बुद्धाची मूर्ती भेट दिली. पांढऱ्या सागाच्या लाकडात ही प्रतिकृती कोरलेली आहे. ती तयार करण्यास दोन वर्षे लागली.  सिरिसेना यांनी विशेष मित्राला दिलेली ही विशेष भेट आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने ट्वीट संदेशात म्हटले आहे.