कोविड १९ साथीच्या काळातही काही देशांनी सीमेपलीकडून दहशतवाद पसरवण्याची कृत्ये केली तसेच धार्मिक विद्वेष पसरवला, अशी टीका भारताने पाकिस्तानचा नामोल्लेख टाळून केली आहे. संयुक्त राष्ट्रांनी या मुद्दय़ावर कुठल्याही धर्माची किंवा दहशतवादाची पाठराखण न करता ठोसपणे भूमिका घ्यावी, असेही भारताने म्हटले आहे.

भारताचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत टी.एस. तिरुमूर्ती यांनी सांगितले, की ‘भारत सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध करतो. धार्मिक पातळीवर भेदाभेद आम्हाला मान्य नाही. काही देश करोना साथीचा गैरफायदा घेत असून फुटीरतावादी कारवाया करीत आहेत. कोविड साथ असताना सीमेपलीकडून दहशतवाद थांबलेला नाही.  निरपराध लोकांचे बळी जातच आहे. धार्मिक विद्वेष पसरवला जात आहे.’ ते म्हणाले, ‘भारताने संबंधित देशांना धर्माच्या आधारावर  विद्वेष पसरवणे थांबवण्याचे आवाहन केले आहे. आपल्या समाजात एकोपा निर्माण करून धार्मिक हिंसाचार थांबवावा, अल्पसंख्याकांचे संरक्षण करावे.’ त्यांचा हा पाकिस्तानला सूचक सल्ला होता.

तिरुमूर्ती जागतिक यहुदी काँग्रेसमध्ये ते बोलत होते. भारत या कार्यक्रमाचा सहपुरस्कर्ता होता. या वेळी जर्मनी, अल्बानिया, अर्जेंटिना, ऑस्ट्रिया, बोस्निया, हझ्रेगोव्हिना, कॅनडा, सायप्रस, झेक प्रजासत्ताक, डेन्मार्क, एस्टोनिया, इस्रायल, रुमानिया, स्लोव्हाकिया, उरग्वे या देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.