अफगाणिस्तानातील मझार-ए-शरीफ शहरातील भारतीय वाणिज्य दूतावासाला दहशतवाद्यांनी सोमवारी सकाळी  पुन्हा एकदा लक्ष्य केले. थोड्याचवेळापूर्वी या परिसरात गोळीबार आणि स्फोटाचे आवाज ऐकू आले आहेत. कालच इंडो-तिबेटियन सुरक्षा दल आणि अफगाण लष्कराच्या जवानांनी याठिकाणी झालेला हल्ला परतवून लावला होता. यामध्ये दोन अतिरेकी ठार झाले होते. दरम्यान, या हल्ल्यानंतर वकिलातील अधिकारी, कर्मचारी सुरक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले होते.
दरम्यान, पठाणकोट अतिरेकी हल्ल्याचा पाकिस्तानने अधिकृतरीत्या निषेध केला असला तरीही दहशतवाद्यांनी फोनवरून पाकिस्तानमध्ये साधलेला संपर्क, हल्ल्याची पद्धत आणि अन्य बाबींवरून हा हल्ला जैश-ए-मोहम्मद संघटनेने केला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा संशयही गुप्तचर सूत्रांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा दौरा केला होता.
पंजाबमध्ये पठाणकोट येथे भारतीय हवाई दलाच्या तळावर शनिवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर रात्रभर शोधमोहीम सुरू होती. या परिसरात आणखी दोन दहशतवादी जिवंत असल्याचे रविवारी दुपारी स्पष्ट झाले आणि त्यांच्याबरोबर सुरक्षा दलांची पुन्हा चकमक सुरू झाली. मोहीम लांबल्याने लष्कराने या परिसरात आणखी कुमक मागवली असून, किमान ५०० जवान तैनात करण्यात आले. गोळीबार अजूनही सुरू आहे.
रविवापर्यंत सुरक्षा दलाचे ७ सदस्य शहीद झाले आणि ५ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. शहीद झालेल्यांमध्ये गरुड कमांडो दलाचा एक सदस्य आणि डिफेन्स सिक्युरिटी कोअरच्या ५ जवानांचा समावेश आहे. शनिवारी जखमी झालेल्या डिफेन्स सिक्युरिटी कोअरच्या ३ जवानांचा शनिवारी रात्री रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला. अजूनही हवाई दलाचे ८ आणि एनएसजीचे १२ जवान उपचार घेत आहेत.
संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पठाणकोट येथील हवाई तळावरच्या ताज्या स्थितीबद्दल माहिती दिली. कर्नाटकमधील तुमकूर येथे हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या कार्यक्रमात दोघेही उपस्थित होते. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) या प्रकरणाचा तपास हाती घेतला आहे.

शहीद गरुड कमांडोला २० लाखांची मदत
पठाणकोट हल्ल्यात शहीद झालेले गरुड दलाचे कमांडो गुरसेवक सिंग यांच्या कुटुंबीयांना हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी २० लाख रुपयांची मदत जाहीर केली. सिंग अंबालामधील गरनाला गावचे रहिवासी आहेत.

* पठाणकोट हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर दिल्लीजवळील हिंदन येथील हवाई दलाच्या तळाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. नवी दिल्ली, मुंबईसह अन्य शहरांतही दक्षतेचा इशारा देण्यात आला.
* लखनऊ शताब्दी एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब असल्याचा ई-मेल मुंबई दहशतवादविरोधी पथकाला रविवारी मिळाला. त्यानंतर गाझियाबाद येथे गाडी थांबवून तपासणी करण्यात आली. बॉम्बशोधक पथकाच्या तपासणीनंतर सकाळी पावणेआठच्या सुमारास रेल्वे पुन्हा मार्गस्थ करण्यात आली.
हवाई तळाची तपासणी करीत असताना झालेल्या स्फोटात राष्ट्रीय सुरक्षा दलाचे (एनएसजी) लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार शहीद झाले. ते मूळ केरळचे असून बाँब निकामी करण्याच्या पथकात तैनात होते. मृत दहशतवाद्याच्या अंगावरील बॉम्ब फुटून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत अन्य चार जवान जखमी झाले.