इजिप्तमधील उत्तर सिनाई प्रांतातील मशिदीवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २३५ जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात जवळपास १०० जण जखमी झाले आहेत. अल-अरिश शहरातील रवाडा मशिदीवर दहशतवाद्यांनी नमाजावेळी बॉम्बहल्ला केला. त्यावेळी मशिदीत मोठी गर्दी होती. यानंतर दहशतवाद्यांनी मशिदीतील लोकांवर अंदाधुंद गोळीबार सुरु केला.

उत्तर सिनाई हा इजिप्तमधील अशांत प्रांत म्हणून ओळखला जातो. या भागाच्या पश्चिमेला साधारणत: ४० किलोमीटर अंतरावर रवाडा मशीद आहे. या मशिदीत नमाज सुरु असताना दहशतवाद्यांनी बॉम्बहल्ला केला. यामध्ये २३५ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती अल-अहराम या सरकारी वर्तमानपत्राच्या संकेतस्थळाने दिली. दहशतवाद्यांच्या बॉम्बहल्ल्यात आणि गोळीबारात जवळपास १०० जण जखमी आले आहेत.

उत्तर सिनाई प्रांत दहशतवादी हल्ल्याने हादरल्यावर इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतह अल सीसी यांनी तातडीची बैठक बोलावली. इजिप्तचे सैन्य उत्तर सिनाई प्रांतात आयसिस या दहशतवादी संघटनेविरोधात धडक कारवाई करत असताना हा हल्ला झाला. या भागात आधीही दहशतवाद्यांनी शेकडो पोलीस कर्मचारी आणि सैनिकांच्या हत्या केल्या आहेत. याशिवाय प्रशासनाला सहकार्य करणाऱ्या नागरिकांच्याही आयसिसच्या दहशतवाद्यांकडून क्रूर हत्या करण्यात आल्या आहेत.