कराचीतील पाकिस्तान शेअर बाजार इमारतीवर सोमवारी सकाळी चार दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात, दोन नागरिक, एक पोलीस अधिकारी आणि चार सुरक्षा रक्षकांसह सात जण ठार झाले, तर सुरक्षा रक्षकांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात चारही दहशतवादी मारले गेले.

शेअर बाजाराच्या इमारतीत घसून काही लोकांना ओलीस ठेवण्याचा प्रयत्न होता परंतु तो फसला, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. मोटारीतून आलेल्या चार सशस्त्र दहशतवाद्यांनी अतिसुरक्षित अशा पाकिस्तान शेअर बाजार इमारतीच्या प्रवेशद्वारावर स्वयंचलित बंदुकांमधून बेछूट गोळीबार केला आणि हातबॉम्बही फेकले. यावेळी सुरक्षारक्षकांशी झालेल्या चकमकीत दोन नागरिक, एक पोलीस निरीक्षक आणि चार सुरक्षा रक्षक ठार झाले, असे ‘जिओ न्यूज’च्या वृत्तात म्हटले आहे. कराचीतील चुंद्रीनगर रस्त्यावर हा शेअर बाजार आहे. हा भाग ‘पाकिस्तान वॉल स्ट्रीट’ म्हणून ओळखला जातो. तेथे मोठय़ा प्रमाणावर वर्दळ असते.

दहशतवादी मोटारीतून आले आणि त्यांनी एके ४७ रायफलने अंधाधुंद गोळीबार सुरू केला. इमारतीवर हातबॉम्बही फेकले. इमारतीत शिरून काहींना ओलीस ठेवण्याचा दहशवाद्यांचा प्रयत्न होता, परंतु सुरक्षा रक्षकांनी तो हाणून पाडल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

दहशतवादी पोलिसांच्या गणवेशात होते, त्यांना सुरक्षा रक्षकांनी अडवताच त्यांनी सुरक्षा रक्षकांवर गोळीबार केला. या वेळी दोन दहशतवादी प्रवेशद्वारावरील चकमकीत मारले गेले, तर इमारतीत घुसलेल्या अन्य दोन दहशतवाद्यांना सुरक्षा रक्षकांनी ठार केले, असेही वृत्तामध्ये म्हटले आहे.

बलोच लिबरेशन आर्मीने जबाबदारी स्वीकारली

अफगाणिस्तानातील बलुचिस्तान लिबरेशन आर्मी या माजीद ब्रिगेडशी संबंधित संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पर्ल काँटिनेन्टल हॉटेलवर याच दहशतवादी गटाने हल्ला केला होता. त्यात आठ जण ठार झाले होते. अमेरिका, ब्रिटन आणि पाकिस्तानने या गटाला दहशतवादी जाहीर केले आहे.