जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी एका पोलीस पार्टीवर केलेल्या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी शहीद झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी पोलिसाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, हल्लेखोर दहशतवादी पोलिसांच्या दोन रायफली घेऊन फरार झाले आहेत. या हल्ल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी संपूर्ण परिसराची नाकाबंदी करीत शोध मोहिम सुरु केली आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते गुलाम मोईनुद्दीन यांच्या घराजवळ मोरन चौकात हा हल्ला झाला.


या हल्ल्यामध्ये दोन पोलीस अधिकारी गंभीररित्या जखमी झाले आहेत. यांपैकी एकाला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव मुद्दसर अहमद असे आहे. तर जखमी पोलीस नाझीर अहमद यांना श्रीनगर रुग्णालयात पुढील उपचारांसाठी पाठवण्यात आले आहे. काश्मीर रिडरने याबाबत वृत्त दिले आहे. हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी पोलिस अधिकाऱ्यांच्या दोन रायफल घेऊन पळ काढला. या हल्ल्याला पुलवामाचे पोलीस अधीक्षक मोहम्मद अस्लम चौधरी यांनी दुजोरा दिला आहे.

दरम्यान, ६ जुलै रोजी पुलवामात दहशतवाद्यांनी तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये पोलीस, लष्कर आणि सुरक्षारक्षकांना निशाणा बनवले होते. तसेच यापूर्वी काश्मीर रायफलचा जवान औरंगजेब आणि आता जम्मू काश्मीर पोलीस कॉन्स्टेबल जावेद अहमद यांना दहशतवाद्यांनी निशाणा बनवले.