अफगाणिस्तानातील हेरातमधील भारतीय दूतावासावर अज्ञात अतिरेक्यांनी शुक्रवारी पहाटे हल्ला केला. भारतीय सुरक्षारक्षकांनी तातडीने कार्यवाही करीत अतिरेक्यांना चोख प्रत्युत्तर दिल्यामुळे दूतावासात कार्यरत असलेल्या सर्वांचा प्राण वाचले. चार अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षारक्षकांना यश आले आहे.
फोटो गॅलरी : अफगाणिस्तानात भारतीय दूतावासावर हल्ला
शुक्रवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास हा हल्ला झाल्याची माहिती मिळाली. इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस आणि अफगाणिस्तान लष्कराच्या जवानांनी अतिरेक्यांच्या गोळ्यांना प्रत्युत्तर दिले. आयटीबीपीच्या जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात एक अतिरेकी तर अफगाणिस्तान लष्कराच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात तीन अतिरेकी ठार झाले. हेरात प्रांताचे पोलिसदल प्रमुख अब्दुल सामी कात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दूतावासाजवळच असलेल्या एका घरामधून चार अतिरेक्यांनी मशीन गन व हातबॉंम्बच्या साह्याने जोरदार हल्ला चढविला. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही.
परराष्ट्र सचिव सुजाता सिंग स्वतः हेरातमधील घडामोडींवर लक्ष ठेऊन आहेत. त्याचबरोबर भारत आणि अफगाणिस्तानीतल अधिकारी हे सुद्धा परस्परांच्या संपर्कात आहेत. प्रस्तावित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफगाणिस्तानमधील भारतीय राजदूतांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला असून, त्यांना सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. पाकिस्ताननेही या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.