नवी दिल्ली : अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये एका आलिशान हॉटेलवर शनिवारी रात्री दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला असून ६ जण जखमी झाले आहेत. हल्लेखोरांपैकी दोन जण स्थानिक पोलिसांच्या चकमकीत ठार झाले आहेत. दरम्यान, हॉटेलमधील १०० पाहुण्यांसह २ कर्मचाऱ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. मुंबईतील २६/११च्या हल्ल्याशी याची तुलना केली जात आहे. अजूनही येथे दहशतवादी आणि पोलिसांमध्ये चकमक सुरु असल्याचे वृत्त काही वृत्तसंस्थांनी दिले.

अफगाणिस्तानच्या टोलो न्यूजच्या वृत्तानुसार, सरकारी प्रवक्ते नजीब दानिश यांनी सांगितले की, घटनास्थळाचा ताबा पोलिसांनी घेतला असून ज्या इंटरकॉन्टीनेन्टल हॉटेलवर हल्ला झाला या हॉटेलचे ५ मजले सुरक्षित करण्यात आले आहेत. हॉटेलमधील १०० पाहुणे आणि २ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात आले आहे. दरम्यान, ६वा मजल्यावरील लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

चार दहशतवाद्यांनी हॉटेलमध्ये घुसून आतील कर्मचारी आणि पाहुण्यांवर अंदाधुंद गोळीबार सुरु केला होता. ६ जखमी लोकांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अफगाणिस्तान सरकारने यापूर्वीच हा दहशतवादी हल्ला असल्याचे जाहीर केले आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, या हॉटेलच्या सुरक्षेची जबाबदारी एका खासगी सुरक्षा कंपनीकडे देण्यात आली आहे. हॉटेलमध्ये अडकलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, हल्लेखोरांनी हॉटेलच्या प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षकांनाच प्रथम ठार केले. त्यानंतर ते स्वयंपाकघराच्या माध्यमातून हॉटेलमध्ये पोहोचले. या हल्लेखोरांनी हॉटेलमध्ये आगही लावली. सुरक्षेच्या कारणास्तव या हॉटेलमधील वीज घालवण्यात आली आहे. सुरक्षारक्षक हेलिकॉप्टरच्या सहाय्याने हॉटेलच्या छतावर उतरले आहेत.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात कमीत कमी १५ लोक मारले गेले असावेत. या हल्लेखोरांनी केलेल्या तुफान गोळीबारात हॉटेलच्या दुसऱ्या मजल्याचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.