सोमालियाची राजधानी असलेल्या मोगादिशूत सुरक्षा नाक्यावर गर्दीच्या ठिकाणी ट्रक बॉम्बचा स्फोट करण्यात आला, त्यात ७३ जण ठार झाले आहेत. अलीकडच्या काळात मोगादिशूत करण्यात आलेला हा सर्वात मोठा हल्ला आहे.

या हल्ल्यातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता असून अनेकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे, अशी माहिती सरकारी प्रवक्ते इस्माइल मुख्तार यांनी दिली.

आमिन रुग्णवाहिका केंद्राचे अबदिकादीर अब्दीरहमान यांनी सांगितले की, मृतांची संख्या ७३ असून इतर पन्नास जण जखमी  झाले आहेत. महापौर ओमर महमूद महंमद यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा मृतात समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये दोन तुर्की नागरिकांचा समावेश आहे. कॅप्टन महंमद हुसेन यांनी दिलेल्या माहितीनुसार कर संकलन केंद्रावर सकाळी गर्दीच्या वेळी हा हल्ला करण्यात आला. वाहनांचे सांगाडे व मृतदेह घटनास्थळी पडलेले दिसत होते. मोठय़ा प्रमाणात काळा धूर दिसत होता. अजून या स्फोटाची जबाबदारी कुणी घेतलेली नाही. पण अल कायदाशी संबंधित अल शबाब ही संघटना नेहमीच असे हल्ले करीत असते. अल शबाब या संघटनेने यापूर्वी ऑक्टोबर २०१७ मध्ये केलेल्या बॉम्बहल्ल्यात ५०० जण ठार झाले होते. पण त्या गटाने कधीच या हल्ल्याची जबाबदारी घेतली नव्हती. काही तज्ज्ञांच्या मते अल शबाबने सरकारचा कमकुवतपणा दाखवण्यासाठी कुठल्याही हल्ल्याची जबाबदारी घेतली नाही. आताच्या हल्ल्याने सोमाली सुरक्षा दलांच्या सज्जतेवर प्रश्नचिन्ह लागले असून अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सूत्रे घेतल्यानंतर अल शबाब संघटनेला अनेकदा हवाई हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले होते. सोमालियाचा दक्षिण व मध्य भाग अल शबाबच्या नियंत्रणाखाली आहे. उद्योगांकडून तसेच प्रवाशांकडून लाखो डॉलर्सची खंडणी अलशबाबचे दहशतवादी घेत असतात त्यावर त्यांच्या कारवाया चालतात.