पाकव्याप्त काश्मीरमधील सर्व दहशतवादी तळ आणि १५ लाँच पॅडस दहशतवाद्यांनी पूर्ण भरले आहेत. लष्कराचे टॉप कमांडर लेफ्टनंट जनरल बी.एस.राजू यांनी ही माहिती दिली. जम्मू-काश्मीरचा विषय धगधगता ठेवण्यासाठी पुढच्या काही दिवसात सीमेपलीकडून घुसखोरीच्या घटनांमध्ये वाढ होऊ शकते असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

“भारताने दहशतवादाचे कंबरडे मोडून टाकले आहे. काश्मीरमध्ये शांतता आहे. कायदा-सुव्यवस्था सुधारली आहे. हे सत्य पचवणे पाकिस्तानला जमत नाहीय” असे बी.एस.राजू पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. लेफ्टनंट जनरल राजू यांनी एक मार्च रोजी श्रीनगरमधील एक्सव्ही कॉर्प्सची सूत्रे स्वीकारली.

“काश्मीरमध्ये अतिरेक्यांचा खात्मा करुन दहशतवादाचे कंबरडे मोडले आहे. काश्मीरचा विषय धगधगता ठेऊन दहशतवाद जिवंत ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसात सीमेपलीकडून घुसखोरीचे प्रयत्न वाढू शकतात” असे राजू म्हणाले.

“पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील सर्व दहशतवादी तळ आणि लाँच पॅडस दहशतवाद्यांनी भरले आहेत. पाकिस्तानी लष्कराच्या मदतीने घुसखोरी करण्याचा या दहशतवाद्यांचा प्रयत्न असेल” असे राजू यांनी सांगितले. “मागच्या ३० वर्षांपासून पाकिस्तानकडून सातत्याने या घुसखोरांना मदत केली जातेय. भारतीय हद्दीत या दहशतवाद्यांना सहजतेने घुसखोरी करता यावी, यासाठी पाकिस्तानने आतापर्यंत अनेक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानला प्रत्येक वेळी भारताने जशास तसे, चोख प्रत्युत्त दिले आहे” असे राजू यांनी सांगितले.

‘पाकिस्तानच्या प्रत्येक आगळीकीला भारताकडून चोख प्रत्युत्तर मिळत असल्यामुळे पाकिस्तान असहाय्य बनला आहे. त्यांना त्यांच्या हेतूमध्ये यश मिळत नाहीय’ असे राजू म्हणाले. सध्या संपूर्ण जग करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहे. पाकिस्तानातही करोना रुग्णांची संख्या वाढतेय पण पाकिस्तानने दहशतवादाची साथ सोडलेली नाही.पीओकेमधील हे सर्व दहशतवादी भारतासाठी उद्या डोकेदुखी ठरणार आहेत. त्यामुळे तिथे आणखी एका स्ट्राइकची गरज आहे.