जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये संशयित दहशतवाद्यांनी भाजप नेते गुल मोहम्मद मीर यांची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यांच्यावर पाच गोळ्या झाडण्यात आल्या.  देशभरात लोकसभा निवडणुकांसाठी मतदान होत असताना काश्मिरमध्ये राजकीय नेत्याच्या हत्येने एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी रात्री तीन दहशतवादी मीर यांच्या नौगाम वोरिनाममधील घरात घुसले होते. त्यांनी मीर यांच्याकडे त्यांच्या गाडीची चावी मागितली आणि गाडी घेऊन जाताना मीर यांच्यावर गोळ्या झाडल्या. छातीत तीन, तर पोटात दोन गोळ्या लागल्यामुळे मीर यांचा मृत्यू झाला. 60 वर्षीय गुल मोहम्मद मीर हे जम्मू काश्मिरमधील अनंतनाग जिल्ह्याचे भाजपा उपाध्यक्ष होते. त्यांना परिसरात अटल नावाने ओळखलं जायचं. त्यांनी जम्मू काश्मिर विधानसभेची निवडणूकही लढवली होती. हत्याकांडानंतर पोलिसांनी नौगाम परिसरातील सुरक्षा वाढवली आहे. दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी झालेल्या मीर यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. आरोपींचा कसून शोध घेतला जात असल्याचंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, जम्मू काश्मिरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. पीडीपीच्या अध्यक्षा मुफ्ती आणि जम्मू काश्मीर प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष जे. ए. मीर यांनीही मीर यांच्या हत्येचा निषेध केला. तर, काश्मीर खोऱ्यातली शांतता भंग करणाऱ्यांविरोधात आणि निष्पापांच्या हत्या करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी भाजपाकडून करण्यात आली आहे.