श्रीनगर: जम्मू- काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्य़ात लष्कर-ए-तैयबाच्या एका उच्चपदस्थ कमांडरसोबत मारला गेलेल्या दहशतवाद्याची ओळख पटली असून, तो पाकिस्तानी असल्याचे उघड झाले आहे. दानिश नावाचा हा पाकिस्तानी दहशतवादी बुधवारी चकमकीत मारला गेल्याचे पोलिसांनी सांगितले.

दोन दहशतवाद्यांची चकमकीत झालेली हत्या ही सुरक्षा दलांची मोठी कामगिरी होती, असे काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांपैकी एक जण लष्कर-ए-तैयबाचा कमांडर नसीरुद्दीन लोणे होता. यावर्षी १८ एप्रिलला सोपोर येथे झालेली सीआरपीएफच्या तीन जवानांची हत्या, तसेच ४ मे रोजी हंदवाडा येथे याच दलाच्या ३ जवानांच्या हत्येत त्याचा हात होता, असे कुमार यांनी बुधवारी सांगितले होते.

दरम्यान, जम्मू—काश्मीरमधील बारामुल्लामधील क्रिरी सेक्टरमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. उत्तर काश्मीरमधील लष्कर ए तोयबाचा कमांडर सज्जाद हैदर, त्याचा पाकिस्तानमधील साथीदार उस्मान आणि स्थानिक अनायतुला यांचा समावेश आहे.